मुंबई : बॉलिवूडमध्ये काही कलाकार हे त्यांच्या कामगिरीमुळं कायमच प्रेक्षकांच्या मनात एक भक्कम स्थान निर्माण करतात. अभिनेता पंकज त्रिपाठी हे नाव त्यापैकीच एक. वेब सीरिजपासून ते अगदी विविध चित्रपटांपर्यंत, सर्वत्रच त्रिपाठी यांनी आपली वेगळी अशी छाप सोडली आहे. पण, त्यांचा हा प्रवास फारसा सोपा नव्हता.
सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांनी बराच संघर्षही केला आहे. हा संघर्ष नेमका काय स्वरुपाचा होता, याचा उलगडा त्यांच्या अनेक मुलाखतींतून झाला आहे.
फक्त मेहनतच नव्हे, तर पंकज त्रिपाठी यांनी लोकांचे बोल आणि त्यांच्याकडून होणारा अपमानही सहन केला आहे.
एका मुलाखतीत पंकज त्रिपाठी यांनी याबाबतचा खुलासा केला. 'प्रत्यक्षात माझा अनेकांनीच अपमान केला. पण, त्या लोकांना आज हे लक्षातही नाही. आजही मला ती मंडळी भेटतात.
अपमान करणाऱ्या व्यक्तींना याचा मात्र विसर पडला आहे की, ते मला काही म्हणाले होते', असं ते म्हणाले होते.
इतरांकडून मिळालेल्या या वागणुकीमुळं आपल्याला फार दु:ख झाल्याचंही त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केलं.
'मीसुद्धा एक व्यक्ती आहे. मला का बरं वाईट वाटणार नाही? मलाही तेव्हा राग येत होता. पण मी या सर्व गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करतो', असं ते म्हणाले.
इतरांबाबत मनात कटुता ठेवण्यामध्ये आपलंच नुकसान असल्याचं म्हणत हीह खुणगाठ बांधत आपण पुढे चालत राहिलो असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आपल्याशी वाईट वागणाऱ्यांप्रती सर्वांच्याच मनात काहीशी कटुता कायम असते. पण, पंकज त्रिपाठी यांनी मात्र या समजुतीला शह दिला आहे हेच त्यांच्या वागण्याबोलण्यातून कळत आहे.
आमिर खानच्या बहुचर्चित प्रेयसीशी विकी कौशलचं काय नातं?
मुळच्या बिहारच्या असणाऱ्या त्रिपाठी यांना सुरुवातीच्या दिसवांमध्ये बॉलिवूडमध्ये बराच संघर्ष करावा लागला होता. ज्यानंतर त्यांना 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये अभिनयाची झलक दाखवण्याची संधी मिळाली.
पंकज त्रिपाठी यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी उचलून धरलं. पाहता पाहता हा अभिनेता भल्याभल्या कलाकारांना स्पर्धाही देऊ लागला.
येत्या काळात पंकज त्रिपाठी '`83' या चित्रपटामध्ये प्रवक्ते मान सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.