Soham Bandekar Marriage : हिंदी सिनेसृष्टीप्रमाणे मराठी मनोरंजनसृष्टीतील स्टार किड्सही प्रचंड लोकप्रिय आहेत. अभिनय बेर्डे, स्वानंदी बेर्डे, सखी गोखले, विराजस कुलकर्णी, शुभंकर तावडे या कलाकारांचा मोठा चाहतावर्ग आहे. या कलाकारांसोबतच अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा देखील सातत्याने चर्चेत असतो. सोहम बांदेकर हा 'नवे लक्ष्य' या मालिकेमुळे घराघरात पोहोचला. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ ही त्याची पहिली मालिका होती. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. आता सोहम बांदेकर हा विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच सोहमने इन्स्टाग्रामवर 'आस्क मी समथिंग' सेशन घेतले. यावेळी त्याला त्याच्या चाहत्यांनी करिअरसह खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारले. यावर त्याने फारच मनमोकळेपणाने उत्तर देत संवाद साधला. यादरम्यान त्याने त्याच्या लग्नाचे संकेत दिले.
"योग्य लाईफ पार्टनर कसा निवडावा? काही सूचना... मी खूप गोंधळलो आहे", असा प्रश्न एका चाहत्याने आस्क मी समथिंग यावेळी सोहम बांदेकरला विचारला. त्यावर सोहमने हसत हसत फारच हटके पद्धतीने उत्तर दिले आहे. "मलाच कळत नाही. कृपया मलाच कोणीतरी हे शिकवा... नाहीतर अरेंज मॅरेज", असे सोहम बांदेकरने म्हटले आहे. यावरुन आता सोहम बांदेकरच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान सोहम बांदेकरने काही वर्षांपूर्वी आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. स्टार प्रवाहवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर झळकला. ही मालिका ७ मार्च २०२१ रोजी सुरु झाली आहे. या चित्रपटातील निर्मिती सोहम प्रॉडक्शन्सने केली होती. या मालिकेत महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध घेतला गेला होता. महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावून सेवा देणाऱ्या पोलिसांची शौर्यगाथा या मालिकेत पाहायला मिळाली. या मालिकेत सोहमने जय सुवर्णा दीक्षित ही भूमिका साकारली होती.
तसेच सोहमने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सध्या सोहम ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या निर्मितीची धुरा सांभाळत आहे. त्यासोबतच आता लवकरच त्याची निर्मिती असलेली नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. घरोघरी मातीच्या चुली असे या मालिकेचे नाव आहे.