बॉलिवूडचे संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचा 2015 मध्ये कॅन्सरमुळे मृत्यू झाला. Lehren Retro ला आदेश श्रीवास्तव यांची पत्नी विजयता पंडित यांनी मुलाखत दिली असून यावेळी त्यांनी आपला मुलगा अवितेश श्रीवास्तव याच्याबद्दल सांगितलं आहे. अवितेश श्रीवास्तव हा गायक, संगीतकार आणि अभिनेता आहे. आपल्या मुलाला इंडस्ट्रीतून काहीच पाठिंबा मिळत नसल्याचं विजयता पंडित यांनी सांगितलं आहे. विजयता पंडित यांनी यावेली आपल्या दिवंगत पतीचा जवळचा मित्र शाहरुख खानला मुलाच्या करिअरसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.
"तो (अवितेश) फार मेहनती आहे. त्याने अॅकॉन, फ्रेंच मोंटाना यांच्यासह संगीत रेकॉर्ड केलं आहे. पण दुर्दैवाने माझ्या मुलाला इंडस्ट्रीतून कोणताही पाठिंबा किंवा मार्गदर्शन मिळत नाही. इंडस्ट्रीतील लोकांना आदेश या जगात नाही हे माहित असताना त्यांनी मुलाला मदत करायला हवी. तुमचा विश्वास बसणार नाही, पण जेव्हा आदेश रुग्णालयात होता तेव्हा शाहरुख खान त्याला भेटायला यायचा. आदेशच्या मृत्यूच्या एक दिवस आधी शाहरुख खानने त्याचा हात हातात घेतला होता. आदेशला तेव्हा बोलायला येत नव्हतं. त्याने मुलाकडे हात दाखवत त्याची काळजी घे सांगितलं होतं. पण आज मला शाहरुख खानशी संपर्कच साधता येत नाही आहे. त्याने माझ्या मुलाला दिलेला नंबर आता सुरु नाही. मला फक्त शाहरुखला आठवण करुन द्यायची आहे की, तो आदेशचा चांगला मित्र होता आणि आता आम्हाला त्याची गरज आहे. मुलासाठी मला त्याची गरज असून तोच आमच्या कुटुंबाचं भविष्य आहे. मी आता काहीच कमावत नाही आहे. मी काहीच करत नाही आहे",
पुढे त्या म्हणाल्या की, "शाहरुख खान माझ्या मुलासोबत त्याचं प्रोडक्शन बॅनर रेड चिलीज एंटरटेनमेंट अंतर्गत एक चित्रपट बनवू शकतो. तो (अवितेश) चांगला अभिनेता आहे. सर एक फ्रायडे नावाच्या चित्रपटात तो काम करत आहे जो ओटीटीवर रिलीज होईल. तो खूप मेहनत घेत आहे. माझ्या मुलाला मदत करत असी मला शाहरुखला आठवण करून द्यायची आहे. त्याला फक्त थोड्या मदतीची गरज आहे. शाहरुख खान फार गोड व्यक्ती आहे. आदेश कॅन्सच्या शेवटच्या स्टेजला असताना दोन वेळा तो त्याला भेटायला आला होता. आता त्याने आश्वासन दिलं होतं, त्याप्रमाणे त्याने मदत करावी. त्याला वडील नाहीत, त्याला मदतीची गरज आहे. आदेशने तुला आश्वासन दिल्याने तू काहीतरी करायला हवंस".
विजयता पंडित यांनी यावेळी शाहरुख खान आज एक मोठा अभिनेता आहे, पण आपले भाऊ जतीन-ललित यांचा त्याच्या यशात मोठा वाटा आहे असं म्हटलं. आपल्या कुटुंबाने करिअरमध्ये दिलेलं योगदान पाहता त्याने काहीतरी करायला हवं असंही त्या म्हणाल्या आहेत.