यशस्वी होऊनही 'बधाई हो'च्या सिक्वलमध्ये आयुष्मान गायब

सिक्वलमध्ये चाहत्यांचा हिरमोड होताना दिसणार आहे. 

Updated: Mar 10, 2020, 11:49 AM IST
यशस्वी होऊनही 'बधाई हो'च्या सिक्वलमध्ये आयुष्मान गायब title=

मुंबई : अभिनेता आयुष्मान खुरानाच्या 'बधाई हो' चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. शिवाय चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील कमालीची कामगिरी केली होती. 'बधाई हो'नंतर आता चित्रपटाचा सिक्वल लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे 'बधाई हो' चित्रपटाच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण सिक्वलमध्ये चाहत्यांचा हिरमोड होताना दिसणार आहे. 

किंबहुना त्याला कारणही तसचं आहे. तर 'बधाई हो' चित्रपटाच्या सिक्वलमध्ये आयुष्मानच्या जागी अभिनेता राजकुमार रावची वर्णी लागली आहे. २०१८ साली आलेल्या 'बधाई हो'मधील आयुष्मानच्या भूमिकेचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं होतं. तर आता सिक्वलमध्ये राजकुमारची भूमिका चाहत्यांच्या पचणी पडेल की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

'बधाई हो' चित्रपटाचं दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केलं होतं. तर सिक्वलच्या दिग्दर्शनाची जबाबदारी हर्षवर्धन कुलकर्णी यांच्या खांद्यावर आहे. चित्रपटात राजकुमार रावसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर झळकणार आहे. सिक्वलमध्ये भूमी एका पीटी शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे तर राजकुमार दिल्लीतील एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. 

२०१८ साली प्रदर्शित करण्यात आलेल्या 'बधाई हो' चित्रपटाला नॅशनल पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. 'बधाई हो' चित्रपटाच्या सिक्वलच्या शूटींगची सुरूवात जूनमध्ये होणार आहे. तर पुढच्या वर्षी २०२१मध्ये चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.