बॉलिवूड अभिनेत्याच्या आयुष्यातील तो काळा दिवस; जेव्हा वडिलांनीच संपवलेलं संपूर्ण कुटुंब

अतिशय हृदयद्रावक कहाणी असणारा हा अभिनेता आहे...

Updated: Oct 22, 2021, 09:07 AM IST
बॉलिवूड अभिनेत्याच्या आयुष्यातील तो काळा दिवस; जेव्हा वडिलांनीच संपवलेलं संपूर्ण कुटुंब
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री काजोलसोबत 1992 मध्ये 'बेखुदी' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या एका अभिनेत्यानं वयाची पन्नाशी नुकतीच ओलांडली. सहसा वाढदिवस अनेकांसाठीच आनंदाचा बहर आणतो, पण या अभिनेत्यासोबत असं नाही घडलं. त्याच्या आयुष्यात एक दिवस असा आला जेव्हा वाढदिवसाच्य़ाच दिवशी त्याच्या आनंदाला दु:खाची किनार मिळाली. तो दिवस ते आजपर्यंत विसरु शकलेले नाहीत. 

अतिशय हृदयद्रावक कहाणी असणारा हा अभिनेता आहे, कमल सदाना  (Kamal Sadanah). अभिनय कारकिर्दीत फारसा यशस्वी नसला तरीही खासगी आयुष्यातील वादळामुळं या अभिनेत्यानं अनेकांच्या नजरा वळवल्या. 1990 मध्ये कमलच्या 20 व्या वाढदिवसाच्याच दिवशी त्याचे वडील बृज सदाना यांनी त्याची बहीण नम्रता आणि आई सईदा खान यांची हत्या केली होती. एका क्षणात कमलचं कुटुंब संपलेलं. 

कमलच्या आईवडिलांमध्ये वारंवार वाद होत होते. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीही असंच काहीतरी झालं. ज्यानंतर दारुच्या नशेत बृज सदाना यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या पिस्तुलनं पत्नी आणि मुलीवर गोळी झाडली. या दोघींचाही जागीत मृत्यू झाला. 

कमलला पाहताच त्याच्यावरही वडिलांनी बंदुक चालवली, जी त्याच्या गळ्याला स्पर्श करुन गेली ज्यामुळं तो वाचला. सर्वांवर गोळ्या झाडल्यानंतर त्याच्या वडिलांनी स्वत:वरही गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. कमलच्या समोरच हा रक्तरंजित प्रकार घडला, ज्याचा त्याच्या मनावर परिणाम झाला. यानंतर कमलला समुपदेशनाच्या मदतीची गरज लागली होती. वडिलांनी नेमकं असं का केलं, याच प्रश्नाचं उत्तर तो आजही शोधत आहे. 

वडिलांनी नेमकं हे पाऊल का उचललं याची कल्पना नसल्याचं कमल एका मुलाखतीत म्हणाला होता. घरात पैशांची चणचण होती ही बाबही त्यानं नाकारली होती. कुटुंबाची चांगली गुंतवणूक असल्यामुळे पैशांचा प्रश्नच नसल्याचं त्यानं म्हटलं होतं. कमलचे वडिल एक चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते होते. त्यांना 'दो भाई', 'यह रात फिर ना आएगी', 'उस्तादों के उस्ताद', 'विक्टोरिया नंबर 203', 'प्रोफेसर प्यारेलाल' या चित्रपटांसाठी आठवलं जातं. 

कुटुंबासोबत हा सर्व प्रकार घडल्यानंतर कमलनं हिंदी चित्रपटविश्वात पाऊल ठेवलं होतं. पण, त्याची कारकिर्द या विश्वात फार काळ तग धरु शकली नाही. 2006 मध्ये त्यानं एका मालिकेतून पुन्हा कलाविश्वात एन्ट्री केली होती. कमलनं मेकअप आर्टिस्ट लीसा जॉन हिच्याशी लग्न केलं. काही महिन्यांपूर्वीच तो पत्नीपासून विभक्त झाल्याचं वृत्त समोर आलं होतं.