Like Ani Subscribe Teaser: काही दिवसांपूर्वी 'लाईक आणि सबस्क्राईब' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्यात अभिनेत्री अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय वाघ यांचा एक सेल्फी होता. ज्यात सेल्फी आणि प्रत्यक्षातील चेहऱ्यावरील हावभाव खूप वेगळे होते. त्यामुळे यामागे काय रहस्य दडले आहे हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझरने प्रेक्षकांच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना येत्या 18 ऑक्टोबर रोजी मिळणार आहेत.
दरम्यान, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून 'लाईक आणि सबस्क्राईब'चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
व्लॅागर अडकणार पोलिसांच्या जाळ्यात?
एकंदरच या चित्रपटाचा टिझर अंगावर शहारा आणणारा आहे. टिझरमध्ये जुई भागवत एका व्लॅागरच्या भूमिकेत दिसत असून ती एका मोठ्या संकटात अडकल्याचेही दिसतेय. तर दुसरीकडे अमृता खानविलकरही पोलिसांच्या मदतीने कशाचा तरी शोध घेत आहे. त्यामुळे या सगळ्याचा परस्परांशी काही संबंध आहे का? डेड बॉडी प्रकरण काय आहे? कोणी कोणाचा खून केला? अमृता खानविकार कोणत्या पुराव्यांच्या शोधात आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला ''लाईक आणि सबस्क्राईब' पाहून मिळणार आहेत. चित्रपटाचा हा रहस्यमयी टिझर पाहून कथा कमाल असणार, हे नक्की !
सगळ्याभोवती फिरणारी रहस्यमयी कथा
चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणतात, 'हल्लीच्या काळात लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो, हे सगळे सोशल मीडियावरील शब्द दैनंदिन वापरातील झाले आहेत. या सगळ्याभोवती फिरणारी ही रहस्यमयी कथा आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवेल. प्रत्येक सीन कथेला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाणारा आहे. रोहित चौहान, डेड बॉडी, पोलीस तपास या सगळ्याचा उलगडा आता लवकरच होणार आहे.'
निर्माते नितीन वैद्य म्हणतात, 'मराठी चित्रपटांमध्ये हल्ली अनेक नवनवीन विषय हाताळले जात आहेत. हासुद्धा एक वेगळा विषय आहे. चित्रपटातील कलाकार, संगीत टीम, दिग्दर्शन, तंत्रज्ञ अशा सगळ्याच गोष्टी खूप उत्तम जुळून आल्या आहेत. हा चित्रपट खरंतर एक कौटुंबिक चित्रपट आहे. मात्र तरुणाईची पसंती मिळवण्यात 'लाईक आणि सबस्क्राईब' नक्कीच यशस्वी होईल.'