बॉलिवूडमध्ये शाहरुख खानसह असे अनेक अभिनेते, अभिनेत्री आहेत ज्यांनी छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरला सुरुवात केली होती. छोटा पडदा गाजवल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा मोठ्या पडद्याकडे वळवला होता. यानंतर त्यांना अनपेक्षित यश मिळालं. या यादीत शाहरुख खानसह सुशांत सिंह राजपूत, विद्या बालन यांचा समावेश आहे. पण या यादीत एका अशाही अभिनेत्रीचं नाव आहे, जी मोठ्या पडद्यावर झळकल्यानंतर लागोपाठ दोन सुपरहिट चित्रपट दिले. पण नंतर मात्र तिने स्वत:च आपलं करिअर उद्ध्वस्त केलं. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घ्या.
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिला लोक संतोषी माँ नावानेही ओळखतात. हो तुम्ही योग्य ओळखलं आहे, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ग्रेसी सिंग आहे. ग्रेसीने वयाच्या 17 व्या वर्षी टीव्हीतून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केल्यानंतर ती मोठ्या पडद्याकडे वळली होती.
ग्रेसीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा 'हु तू तू' आणि 'हम आपके दिल में हैं' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. यानंतर तिला मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या लगान चित्रपटात मोठा ब्रेक मिळाला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. 2001 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा ठरला होता. इतकंच नाही तर तो थेट ऑस्करपर्यंत पोहोचला होता. यानंतर ग्रेसी संजय दत्तसोबत 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटात झळकली होती. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. अशाप्रकारे ग्रेसीने लागोपाठ दोन सुपरहिट चित्रपट दिले.
सलग दोन सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर मात्र ग्रेसीच्या करिअरला उतरती कळा लागली. तिचे सर्व चित्रपट फ्लॉप होऊ लागले. यामध्ये 'मुस्कान', 'शर्त', 'वजह' आणि 'यही है जिंदगी है' असे चित्रपट होते. चित्रपट फ्लॉप होत असतानाच ग्रेसीने करिअरमधील सर्वात मोठी चूक केली. तिने केआरकेचा चित्रपट 'देशद्रोही'मध्ये काम केलं. हा चित्रपट सपशेल आपटला होता. पण याचा परिणाम ग्रेसीच्या करिअरवरही झाला. यानंतर तिने काही चित्रपटांमध्ये काम केलं, पण तेही फ्लॉप झाले.
2015 मध्ये अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर ग्रेसी पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळली. तिने संतोषी माता मालिकेत काम केलं. यामुळे ग्रेसीचा आता वेगळाच चाहतावर्ग निर्माण झाला आहे. तिचे अनेक चाहते तर तिला संतोषी माता नावानेच ओळखतात.