Tanu Weds Manu 3 : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. अशातच आता दुसरीकडे कंगनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. निर्मात्यांनी आर माधवन आणि कंगना रणौतच्या 'तनु वेड्स मनु 3' या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची तयारी सुरु केली आहे. आनंद एल रायचा 2011 मध्ये प्रदर्शित झालेला 'तनु वेड्स मनु' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला होता. या चित्रपटाचा दुसरा भाग देखील 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. अशातच आता निर्मात्यांनी 'तनु वेड्स मनु 3' भागाची तयारी सुरु केली आहे.
'तनु वेड्स मनु 3' तिसऱ्या भागामध्ये नेमकं काय?
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, आनंद एल राय यांच्या 'तनु वेड्स मनु 3' चित्रपटाचे लेखन पूर्ण झाले आहे. चित्रपटातील कलाकार देखील निश्चित झाले आहेत. हिमांशु शर्मासोबत आनंद एल राय यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटाची कथा पहिल्या आणि दुसरा भाग संपला तेथून होत आहे. या चित्रपटामध्ये देखील रोमान्स आणि मनोरंजन बघायला मिळणार आहे. 2025 पासून या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले आहे.
तिहेरी भूमिकेत दिसणार कंगना रणौत
'तनु वेड्स मनु 3' बाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री कंगना रणौत या चित्रपटात तिहेरी भूमिकेत दिसणार आहे. तर आर माधवनची फक्त एकच भूमिका असणार आहे. कंगना म्हणाली की, तिला या चित्रपटाची स्क्रिप्ट खूप आवडली आहे. ती या चित्रपटात तिहेरी भूमिका करण्यासाठी देखील प्रचंड उत्सुक आहे.
कारण अभिनेत्री कंगना रणौतच्या कारकिर्दीतील हा पहिला चित्रपट असणार आहे. ज्यामध्ये कंगना तिहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. कंगना रणौतने 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली होती. तिच्या या चित्रपटातील दोन्ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या.