मुंबई : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगली यांच्यातर्फे हा पुरस्कार दरवर्षी वितरित केला जातो. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे यांनी सांगली येथे विष्णुदास भावे गौरव पुरस्काराची घोषणा केली.
रंगभूमी दिनी म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांच्या हस्ते त्यांना पदक देऊन गौरवण्यात येणार आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष शरद कराळे यांनी ही माहिती दिली.
रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या श्रेष्ठ कलावंतांना विष्णूदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते. यंदा समारंभाचे हे ५४ वे वर्ष आहे. रंगभूमीदिनी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता विष्णूदास भावे नाट्य विदयामंदिर येथे होणाऱ्या समारंभात प्रेमानंद गजवी यांच्या हस्ते वितरण सोहळा होणार आहे.
यापूर्वी हा पुरस्कार बालगंधर्व, केशव दाते, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, विठाबाई नारायणगावकर, प्रभाकर पणशीकर, वसंत कानेटकर, विक्रम गोखले आदींसह अन्य मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे.