महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात होणार कतरिनाची जाऊबाई; 'या' चित्रपटातून केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण

Who Is Sharvari Wagh: बॉलिवूडची अभिनेत्री कतरिना कैफ हिचा आज वाढदिवस आहे. कतरिनाची जाऊबाई हिनेदेखील तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 16, 2023, 07:14 PM IST
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात होणार कतरिनाची जाऊबाई; 'या' चित्रपटातून केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण title=
actress Sharvari Wagh is the granddaughter of Maharashtras former CM

Sharvari Wagh: बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif Birthday) हिचा आज वाढदिवस आहे. तिच्या या खास दिवसासाठी कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी तिला शुभेच्छा देऊ केल्या आहेत. मात्र, अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) भाऊ आणि त्याच्या गर्लफ्रेंडने कतरिनाला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सध्या चर्चेत आहे. कतरिना कैफचा दीर आणि विकी कौशलचा भाऊ सनी कौशल (Sunny Kaushal) सध्या अभिनेत्री शर्वरी वाघला (Sharvari Wagh) डेट करतोय. कतरिनाची होणारी जाऊबाई ही महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात आहे. कोण आहे शर्वरी वाघ जाणून घेऊया. (Sharvari Wagh Grandfather)

बंटी बबली 2 या चित्रपटातून शर्वरी वाघने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर सनी कौशलसोबतच्या नात्यामुळं ती चर्चेत आली होती. शर्वरीचा जन्म 14 जून 1996 रोजी मुंबईत झाला आहे. तिचे वडील शैलेश वाघ हे मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आहेत. तर तिची आई नम्रता आणि बहिण कस्तुरी वाघ या दोघी आर्किटेक्ट आहेत. इतकंच नव्हे तर शर्वरी मोठ्या राजकीय घराण्याशी संबंधित आहे. शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची ती नात आहे. मनोहर जोशी यांची मुलगी नम्रता वाघ यांची ती मुलगी आहे. 

बंटी और बबली- २ या चित्रपटात काम करण्याआधीपासूनच ती कलाविश्वात सक्रीय आहे. याआधी तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिकरला सुरुवात केली होती. प्यार का पंचनामा-2, बाजीराव मस्तानी, सोनू के टीटू की स्वीटी यासारख्या चित्रपटांमध्ये तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. 

शर्वरी आणि सनी कौशल यांच्या नात्याची सर्वाधिक चर्चा विकी आणि कतरिनाच्या लग्नात झाली होती. विकी-कतरिनाचे लग्न राजस्थानमध्ये अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडले होते. त्यावेळी शर्वरी वाघ हिला देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. लग्नाच्या सर्व सोहळ्यात शर्वरीची उपस्थिती होती. त्याचवेळी सनी कौशल आणि शर्वरीच्या जोडीवर अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या. तेव्हापासून ते दोघे डेट करत आहेत. तसंच, ते दोघं लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

इतकंच नव्हे तर, कतरिना आणि शर्वरी यांच्यातही चांगली मैत्री झाली आहे. मागील वर्षी कतरिनाचा वाढदिवस मालदिवला साजरा करण्यात आला होता. तिथेही शर्वरीला संपूर्ण कुटुंबासोबत दिसली होती. आत्ताही कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शर्वरीने मालदिवमधील दोघींचा गोड फोटो शेअर केला आहे. त्यामुळं शर्वरी आणि सनी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.