सुमोना चक्रवर्तीला कपिल शर्मा शोमधून काढून टाकण्यात आलं? अभिनेत्रीने केला खुलासा, 'हे फार विचित्र...'

स्टँडअप आर्टिस्ट सुमोना चक्रवर्ती सध्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा भाग नसून लवकरच 'खतरों के खिलाडी 14' मध्ये दिसणार आहे.     

शिवराज यादव | Updated: Jul 21, 2024, 03:49 PM IST
सुमोना चक्रवर्तीला कपिल शर्मा शोमधून काढून टाकण्यात आलं? अभिनेत्रीने केला खुलासा, 'हे फार विचित्र...' title=

कपिल शर्मा शोमुळे प्रसिद्धीस आलेली सुमोना चक्रवर्ती सध्या मात्र या कार्यक्रमाचा भाग नाही. सुमोनाने स्वत:हून शो सोडला नसल्याचा दावा आहे. तसंच काही रिपोर्टनुसार, तिला कपिलच्या नवीन शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'बद्दल देखील सांगण्यात आलं नव्हतं. काहींनी असा दावा केला आहे की, सुमोना कपिलवर नाराज होती. दरम्यान न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत, सुमोनाने सर्व अफवा फेटाळून असून यात अजिबात तथ्य नाही असं म्हटलं आहे. 

'बडे अच्छे लगते है' मध्ये काम केलेली ही अभिनेत्री आता 'खतरो के खिलाडी 14' मध्ये दिसणार आहे. दरम्यान तिला कपिल शर्मा शोसंबंधी विचारण्यात आलं असता म्हणाली की, "हे फार विचित्र आहे, कारण काही दिवसांपूर्वी एक चांगला लेख आला होता. मी पत्रकाराशी बोलले होते आणि त्याला नेमकं उलटं सांगितलं होतं. यानंतर दोन दिवसांनी आणखी एका पब्लिकेशनने मी सांगितलं त्याच्या उलट लेख छापण्याचा निर्णय घेतला. मी रोमानियात असल्याने मला त्याच्यावर काही बोलायचं नव्हतं".

“मी वारंवार हेच सांगितलं आहे की, मी गेल्या वर्षी जुलैमध्ये संपलेल्या शोचा भाग होतो आणि असंच काहीच नाही की मी बाहेर पडले किंवा मी राजीनामा दिला किंवा मला काढून टाकले. जुलैमध्ये शो संपला आणि त्यानंतर आम्ही सर्वजण आपापल्या कामात व्यग्र झालो. त्यानंतर आम्ही आमचे वैयक्तिक प्रोजेक्ट हाती घेतले. मी 'खतरों के खिलाडी' करत आहे. त्याने (कपिल शर्मा) दुसरा शो केला. कोणीही कोणाचा वाईट विचार करत नाही. मी (कपिलशी) नाराज का असेन? त्याने आणि मी आधी काम केलं आणि मी रोमानियाला गेलो,” असं ती म्हणाली.

'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' आणि नंतर 'द कपिल शर्मा शो'मधून छोट्या पडद्यावर प्रसारित झाल्यावर सुमोना कपिल शर्माच्या कॉमेडी शोचा अविभाज्य भाग होती. दरम्यान आपल्याबद्दल नकारात्मक रिपोर्ट वाचून वाईट वाटतं का? असं विचारण्यात आलं असता सुमोनाने आता या गोष्टींचा आपल्यावर फार परिणाम होत नाही असं म्हटलं आहे. ती म्हणाली, 20 वर्षांपूर्वी जेव्हा करिअरला सुरुवात केली तेव्हा याचा परिणाम व्हायचा. पण आता, तिने स्वतःला नकारात्मकतेपासून दूर ठेवण्याचा एक मंत्र शोधला आहे. या मंत्राची मी सतत पुनरावृत्ती करते तो म्हणजे "माझ्याबद्दल तुमचे मत माझी जबाबदारी नाही". 

सुमोना 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा भाग नाही. दरम्यान 27 जुलै रोजी प्रीमियर होणाऱ्या 'खतरों के खिलाडी 14' या रिॲलिटी शोमध्ये ती दिसणार आहे. आपण या शोमध्ये सहभागी झाल्याने स्वत:ला आश्चर्य वाटत आहे असं सुमोना म्हणाली आहे. तसंच याच्या निमित्ताने व्यक्तिमत्त्वाची दुसरी बाजू पाहण्यासाठी उत्सुक असल्याचंही म्हटलं आहे.