मुंबई : बॉलिवूडमध्ये सनी लिओनी आता एक मोठं नाव आहे. मात्र सुरूवातीला आणि आताही काही प्रमाणात तिच्याकडे संकुचित वृत्तीने बघितले जाते. पण आज ती मोठमोठ्या बॅनरच्या सिनेमांमध्ये काम करते आहे.
इतकेच काय तर मोठ्या स्टार्ससोबतही बघायला मिळत आहे. सुरुवातीला तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याचा तिने अनेकदा खुलासा केलाय. आता पुन्हा एकदा तिने अशाच काही गोष्टींचा खुलासा पुन्हा एकदा केला आहे.
सनी लिओनी नुकतीच नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या कार्यक्रमात आली होती. तेव्हा तिने मनमोकळेपणाने तिचे अनुभव शेअर केलेत. यात तिने सांगितले की, ‘पहिल्यांदाच एका अवॉर्ड शोमध्ये मला बोलवण्यात आले होते. या शोमध्ये आयोजकांना माझ्यासोबत आणखी एका अभिनेत्रीला स्टेजवर पाठवायचं होतं. पण त्या अभिनेत्रीने स्पष्ट नकार दिला’.
सनी म्हणाली की, ‘तेव्हा मी इंडस्ट्रीत नवीन होती आणि लोक माझ्या भूतकाळाबद्दलच बोलत होते. इंडस्ट्रीतील अनेक महिला मला पसंत करत नव्हत्या. मला त्या गोष्टीने काहीही फरक पडत नाही. पण अशा लोकांसोबत बसण्यात जरा अजिब वाटतं. मी तिथे बराच वेळ बसून राहिले, कारण माझ्यासोबत एकही अभिनेत्री येण्यास तयार नव्हती. तेव्हाच ही बाब डॅनियलला कुणीतरी सांगितली आणि तो माझ्यासोबत स्टेजवर येण्यासाठी तयार झाला’.