Adipurush Theatre Release: 'बाहुबली' फेम अभिनेता प्रभासचा आगामी बिग बजेट चित्रपट 'आदिपुरुष' (Adipurush) हा 16 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. ओम राऊत दिग्दर्शित चित्रपटामध्ये प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या तर अभिनेत्री कृती सेनन सीमामातेच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटामध्ये रावणाची भूमिका सैफ अली खानने साकारली आहे. या चित्रपटासाठी 500 ते 600 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच चित्रपटाचं दमदार प्रमोशन केलं जात आहे. यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जात आहे. मात्र आता याच मार्केटींगसंदर्भातील एक अजब बातमी समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार 'आदिपुरुष' ज्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे त्या चित्रपटगृहांमधील एक सीट भगवान हनुमानाच्या नावाने रिकामी ठेवली जाणार आहे. अशाप्रकारे कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच चित्रपटगृहातील एखादी विशेष जागा रिकामी ठेवण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.
"ज्या ठिकाणी रामायणची कथा सांगितली जाते तिथे भगवान हनुमान प्रकट होतात असा आमचा विश्वास आहे. याच श्रद्धेचा सन्मान करण्यासाठी प्रत्येक चित्रपटगृहामध्ये जिथे जिथे प्रभासची प्रमुख भूमिका असलेला 'आदिपुरुष' चित्रपट प्रकाशित होणार आहे तिथे एक सीट हनुमानासाठी रिकामी ठेवली जाणार आहे. या सीटवर कोणत्याही प्रेक्षकाला रिझर्व्हेशन मिळणार नाही," असं 'आदिपुरुष'च्या टीमनं स्पष्ट केलं आहे. "रामाच्या सर्वात मोठ्या भक्ताला आम्ही वाहिलेली ही अनोखी आदरांजली आहे. आपण सर्वांनी भगवान हनुमानाच्या उपस्थितीत हा चित्रपट पहायला पाहिजे," असंही निर्मात्यांनी म्हटलं आहे.
Team #Adipurush to dedicate one seat in every theater for Lord Hanuman
Jai Shri Ram #Adipurush in cinemas worldwide on 16th June! #AdipurushTrailer2 #AdipurushOnJune16th#AdipurushActionTrailer#AdipurushIn3D #Prabhas #SaifAliKhan #KritiSanon #SunnySingh #OmRaut pic.twitter.com/UcP7Aafks8
— Movies wallah (@Movies_Wallah) June 6, 2023
केवळ ही सीट रिकामी सोडली जाणार नाही तर या सीटच्या बाजूच्या सीटचं तिकीटही तब्बल दुप्पट असणार आहे. चित्रपट व्यवहाराचे तज्ज्ञ किस्टोफर कनगराज यांनी 'आदिपुरुष' चित्रपटाबद्दलची ही माहिती दिली आहे. "पीव्हीआरमधील 'आदिपुरुष'च्या तिकीटांचे दर... साधी सीट 250 रुपये तर हनुमानाच्या सीटच्या बाजूची सीट 500 रुपये," असं कनगराज यांनी म्हटलं आहे.
PVR ticket rates for #Adipurush
NORMAL SEAT : 250
TICKETS NEXT TO HANUMAN SEAT : 500[Shared]
— Christopher Kanagaraj (@Chrissuccess) June 6, 2023
'आदिपुरुष' हा चित्रपट त्याच्या टीझरच्या प्रदर्शनापासूनच चर्चेत आहे. टीझरमधील अनेक गोष्टी चाहत्यांना खटकल्या होत्या. यानंतर ट्रेलरमध्ये अनेक सकारात्मक बदल करण्यात आले होते. तरीही या ट्रेलरमधील अनेक गोष्टी आणि व्हीएफएक्सही चाहत्यांना फारसे पटल्याचं दिसलं नव्हतं. त्यामुळेच आता या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो. हा चित्रपट तिकीटबारी गाजवणार की पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 'बाहुबली'नंतर प्रभासला कोणत्याही चित्रपटामधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे प्रभासच्या करिअरच्या दृष्टीनेही 'आदिपुरुष' हा चित्रपट महत्त्वाचा मानला जात आहे.