'दयाबेन'मागोमाग आणखी एका अभिनेत्रीचा 'तारक मेहता.....'ला रामराम?

काही महिन्यांपासून या मालिकेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. 

Updated: Apr 9, 2019, 04:31 PM IST
'दयाबेन'मागोमाग आणखी एका अभिनेत्रीचा 'तारक मेहता.....'ला रामराम?
दिशा वकानी

मुंबई : सासू- सुनांची भांडणं आणि कावेबाजपणा अशा मालिकाच्या रटाळ कथानकांना शह देत 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. पण, काही महिन्यांपासून या मालिकेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या 'दयाबेन' अर्थात अभिनेत्री दिशा वकानी हिने 'तारक मेहता.....'ला रामराम ठोकल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. किंबहुना तिच्या ऐवजी पर्यायी अभिनेत्रीची शोधाशोधही सुरु झाल्याची खुद्द मालिकेच्या निर्मात्यांनीच स्पष्ट केलं. 

दिशाच्या जाण्याने मालिकेच्या लोकप्रियतेची गणितंच बदलण्याची चर्चा असताना आणखी एका बातमीने सर्वांचच लक्ष वेधलं आहे. ती बातमी म्हणजे, आणखी एका कलाकाराच्या गच्छंतीची. 'दयाबेन'ने 'तारक मेहता.....'ची वाट सोडल्यांनंतर तिच्यामागोमाग आता 'सोनू' म्हणजेच अभिनेत्री निधी भानूशाली हिसुद्धा मालिका सोडण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. 

Nidhi Bhanushali to bid adieu to 'Taarak Mehta..' ?

निधी मालिकेत 'आत्माराम तुकाराम भिडे' यांच्या मुलीची म्हणजेच 'सोनू भिडे' हिची भूमिका साकारते. मालिकेच्या एकंदर कथानकामध्ये तिच्या भूमिकेलाही चांगलीच लोकप्रियता आहे. पण, आता मात्र तिच या मालिकेतून काढता पाय घेत असल्यामुळे 'तारक मेहता...'ला आणखी एक धक्का बसला आहे, असंच म्हणावं लागेल. 

येत्या दिवसांत निधी तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करु इच्छित असल्यामुळेच तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. येत्या काही भागांमध्ये मालिकेतही ती उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार असल्याचं दाखवण्यात येणार असल्यचाची चर्चा आहे. निधीने २०१२ मध्ये मालिका विश्वात पदार्पण करत 'तारक मेहता....'च्याच माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. झील मेहताच्या जागी तिने सोनूच्या भूमिकेची धुरा सांभाळली होती. जवळपास सहा वर्षांहून अधिक काळ ती या मालिकेशी जोडली गेली होती.