मुंबई : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आता सेलिब्रिटींनीही पुढाकार घेतला आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. नाम फाऊंडेशन मुख्यमंत्री निधीसाठी ५० लाख रुपये, तर पंतप्रधान निधीसाठी ५० लाख रुपये मदत देणार आहे. अभिनेते नाना पाटेकर यांनी ही घोषणा केली आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २२० पर्यंत पोहोचली आहे. तर मुंबईमध्ये कोरोनाचे १२६ रुग्ण आहेत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. यातले ८ मृत्यू मुंबईत तर १ बुलडाण्यात आणि १ पुण्यात झाले आहेत. देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक हजाराच्या वर पोहोचली आहे. भारतात कोरोनामुळे २९ जणांना जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं. या आव्हानानंतर अभिनेते, खेळाडू आणि व्यावसायिकांकडून आर्थिक मदत यायला सुरुवात झाली.
अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान केयर्स फंडाला २५ कोटी रुपयांची मदत केली. तर बीसीसीआयने ५१ कोटी रुपये दिले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्री निधीला २५ लाख रुपये आणि पंतप्रधान निधीला २५ लाख रुपयांची देणगी दिली. अजिंक्य रहाणेनेही मुख्यमंत्री निधीला १० लाख रुपये दिले.
कोरोनाशी लढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र बँक खातं सुरू केलं. या बँक खात्यात मदतीचा ओघ सुरूच आहे. गेल्या २ दिवसात या सहायता निधीत १२.५० कोटी रुपये आणि १० कोटींची वैद्यकीय उपकरणं जमा झाली आहेत.