JNU वादावर अजय देवगनची ट्विटरवरुन प्रतिक्रिया

अजयचा 'तानाजी: द अनसंग वॉरियर' चित्रपट १० जानेवारीला प्रदर्शित झाला.

Updated: Jan 11, 2020, 05:32 PM IST
JNU वादावर अजय देवगनची ट्विटरवरुन प्रतिक्रिया title=
संग्रहित फोटो

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा (Ajay Devgn) 'तानाजी: द अनसंग वॉरियर' (Tanhaji: The Unsung Warrior) चित्रपट १० जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शनानंतर अजयने जेएनयूत झालेल्या हिंसेबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजयने ट्विट करत, सर्वांनी शांती आणि बंधुभावाची भावना जोपासण्याचं आवाहन केलं आहे. 

अजनने केलेल्या या ट्विटनंतर त्यावर आता अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने अजयच्या प्रतिक्रियेवर त्याला सिंघम म्हणत त्याचं कौतुक केलं आहे. तर काही युजर्सनी नुकत्याच प्रदर्शित झालेला 'तानाजी...' चित्रपट ब्लॉकबस्टर होणार असल्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

५ जानेवारी रोजी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या तुंबळ हाणामारीत जेएनयू स्टुडंट युनियनची अध्यक्ष आयेषी घोष हिच्यावर हल्ला झाला. बुरखाधारी अज्ञातांनी तिच्यावर हल्ला करुन बेदम मारहाण केल्याचा आरोप, आयेषी घोषने केला. काही बुरखाधाऱ्यांनी जेएनयूच्या परिसरात प्रवेश करत लाठ्या-काठ्या आणि लोखंडाच्या रॉडने विद्यार्थिनी आणि शिक्षकांना मारहाण केली होती. या प्रकरणानंतर याचे पडसाद दिल्लीसह मुंबई, पुण्यातही पाहण्यात आले.  

दरम्यान, जेएनयूत झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूडमधूनही अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. 'छपाक' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी दीपिका पदुकोण जेएनयूत गेल्यानंतर तिच्यावर अनेक प्रकारच्या टीका केल्या गेल्या. 

अजय देवगनचा 'तानाजी: द अनसंग वॉरियर' चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंतीही मिळतेय. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अजय-काजोलची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. 'तानाजी...'ने पहिल्याच दिवशी १६ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. अजय देवगनसाठी हा चित्रपट अतिशय खास असल्याचं बोललं जातंय. अजय देवगनचा हा १००वा चित्रपट आहे.