मुंबई : राज्यातील कलावंतांच्या नाट्याविष्काराला प्रोत्साहन देणारी, मराठी-हिंदी कलाकारांच्या उपस्थितीत पार पडणारी, भव्यदिव्य पारितोषिके असलेली आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा अहमदनगर महाकरंडक २०२२ - रंगभूमीची रणभूमी “उत्सव रंगभूमीचा, नवरसांचा.” अहमदनगरमध्ये १२ ते १६ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे.
अनुष्का मोशन पिक्चर्स अॅण्ड एंटरटेन्मेंट आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित आणि श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा झी-मराठी च्या सहयोगाने अहमदनगर शहरातील माऊली सभागृहात पार पडणार आहे.
अशी माहिती अहमदनगर महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली. श्री. नरेंद्र फिरोदिया म्हणाले, “स्पर्धेचे हे नववं वर्षे आहे. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंतांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभलं आणि लाभत आहे. अहमदनगर महाकरंडक स्पर्धेमुळॆ महाराष्ट्रभरातील रंगकर्मींना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. त्यामुळे नाट्यकलावंतांना या अहमदनगर महाकरंडक स्पर्धेची उत्सुकता असते.
१२ ते १६ जानेवारी २०२२ दरम्यान अहमदनगर महाकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे. अहमदनगर महाकरंडकच्या वाढत्या प्रसिद्धीची दखल मराठी वाहिन्यांनीदेखील घेतलेली आहे. झी-मराठी या मराठी वाहिनीचा यावेळी महाकरंडकात सहयोग असणार आहे. त्यामुळे यावेळीची स्पर्धा अधिकच दर्जेदार आणि कसोटी पाहणारी असेल असे अहमदनगर महाकरंडकचे संयोजक स्वप्नील मुनोत यांनी सांगितलं.