मुंबई : जेष्ठ अभिनेते, चित्रपट निर्माते अमोल पालेकर तब्बल २५ वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करण्यास सज्ज झाले आहेत. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप चाहत्यांच्या मनावर पाडणारे पालेकर हिंदी नाटक ‘कसूर’मधून ते रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत.
संध्या गोखले लिखीत या नाटकाची निर्मिती जे.एस.डब्ल्यू आणि अनान यांनी एकत्रितरित्या केली आहे. त्याचप्रमाणे संध्या आणि पालेकरांनी नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली आहे. २४ नोव्हेंबर रोजी ते वयाच्या ७५व्या वर्षात पाऊल ठेवणार आहेत.
तर याच गोष्टीचं औचित्य साधत टाटा थिएटर, एनसीपीए, मुबंईमध्ये या नाटकाच्या शोचा प्रीमियर होणार आहे. 'कसूर’मधून ते निवृत्त एसीपी दंडवते यांची भूमिका साकारणार आहेत.
'एका कलाकाराच्या नात्याने वयाच्या ७५व्या वर्षी अशी भूमिका साकारणं फार आव्हानात्मक आहे. कारण, या पात्रासाठी जबरदस्त भावनात्मक आणि शारीरिक ऊर्जेची आवश्यकता आहे.' असं वक्तव्य जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी केलं आहे.