मुंबई: आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनायाने रुपेरी पडदा गाजवणाऱ्या अमरीश पुरी यांची आज ८७ वी जयंती आहे. यानिमित्ताने अनेकांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. वैशिष्टयपूर्ण आवाज, भेदक डोळे आणि उत्तम अभिनय या जोरावर अमरीश पुरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. आपल्या तब्बल चार दशकांच्या कारकीर्दीत अमरीश पुरी यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.
अमरीश पुरी यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका हीच त्यांची खरी ओळख ठरली. 'मिस्टर इंडिया'मधील 'मोगैंबो', 'विधाता'मधील 'जगावर', 'मेरी जंग' मधील 'ठकराल', 'त्रिदेव'मधील 'भुजंग', 'घायल'मधील 'बलवंत राय', 'करण अर्जुन' मधील 'दुर्जन सिंह' या त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. तर 'दिलवाले दुल्हनियाँ'मध्ये साकारलेल्या 'चौधरी बलदेव सिंग' या भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरकडून सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
१. मोगैंबो खुश हुआ
'मिस्टर इंडिया' चित्रपटात अमरीश पुरी यांनी साकारलेल्या 'मोगैंबो'च्या भूमिकेने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. यामधील त्यांचा 'मोगैंबो खुश हुआ' हा संवाद प्रचंड गाजला.
२. जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी
हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रियतेचे नवे मापदंड रचणाऱ्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटाच्या यशात अमरीश पुरी यांनी साकारलेल्या 'चौधरी बलदेव सिंग' या भूमिकेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. या चित्रपटातील क्लायमॅक्स सीनमधील अमरीश पुरी यांचा 'जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी' हा संवाद प्रचंड गाजला होता.
३. पैसों के मामले में मैं पैदाइशी कमीना हूं, दोस्ती और दुश्मनी का क्या, अपनों का खून भी पानी की तरह बहा देता हूं
सलमान खान आणि शाहरूख खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या करण-अर्जुन चित्रपटात अमरीश पुरी यांनी 'दुर्जन सिंह' ही भूमिका साकारली होती.
४. आओ कभी हवेली पर
'नगीना' या चित्रपटातील अमरीश पुरी यांचा हा आणखी एक संवाद प्रचंड लोकप्रिय ठरला. या चित्रपटात एखादी वाईट घटना घडण्यापूर्वी अमरीश पुरी हा संवाद उच्चारत असत.
५. जिंदगी में भी वीसीआर की तरह रिवाइंड बटन होता तो, कितना अच्छा होता
'नायक- द रिअल हिरो' हा चित्रपट अमरीश पुरी आणि अनिल कपूर यांच्यातील अभिनयाच्या जुगलबंदीमुळे चांगलाच गाजला होता. यामध्ये अमरीश पुरी यांनी बलराज चौहान या भ्रष्ट नेत्याची भूमिका साकारली होती.
६. इतने टुकड़े करूंगा कि तू पहचान नहीं सकेगा
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'गदर- एक प्रेम कथा' या चित्रपटात अमरीश पुरी यांनी अशरफ अली ही भूमिका साकारली होती.
७. जवानी में अक्सर ब्रेक फ़ेल हो जाया करते हैं !
'फूल और काँटे' चित्रपटातील अमरीश पुरी यांचा हा संवादही चांगलाच गाजला होता. या चित्रपटात त्यांनी नागेश्वर या खलनायकाची भूमिका साकारली होती.
८. जब भी मैं किसी गोरी हसीना को देखता हूं, मेरे दिल में सैकड़ों काले कुत्ते दौड़ने लगते हैं
शहेनशहा या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचे अनेक संवाद तुफान गाजले होते. मात्र, या सगळ्यातही अमरीश पुरी तोडीस तोड भूमिका साकारून प्रेक्षकांच्या स्मरणात राहिले.
९. अजगर किसे कब और कहां निगल जाता है ये तो मरने वाले को भी पता नही चलता
'विश्वात्मा' या चित्रपटात अमरीश पुरी यांनी अजगर जोर्राट ही व्यक्तिरेखा साकारली होती.
१०. जो जिंदगी मुझसे टकराती है, वो सिसक-सिसक के दम तोडती है
१९९० साली आलेल्या 'घायल' चित्रपटातील अमरीश पुरी यांची बलवंत राय ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली होती.