अरुण जेटलींच्या निधनाने बॉलिवूडकडूनही शोक व्यक्त

जेटलींच्या जाण्याने बॉलिवूडकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

Updated: Aug 24, 2019, 02:22 PM IST
अरुण जेटलींच्या निधनाने बॉलिवूडकडूनही शोक व्यक्त  title=

मुंबई : माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे शनिवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. ९ ऑगस्टपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर गेल्या काही दिवसांपासून मृत्यूशी सुरु असलेली त्यांची झुंज आज संपली. जेटलींच्या निधनाने देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. बॉलिवूडकडूनही जेटलींच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेता रितेश देशमुखने जेटलींचा एक फोटो शेअर करत यांना आदरांजली व्यक्त केली आहे.

'अरुण जेटलींचे निधन झाल्याचे ऐकून अतिशय दुख: झाल्याचं' रितेशने ट्विट करत म्हटलं आहे. 

अभिनेत्री कोयना मित्रानेही, 'आपल्या देशाने आणखी एक महान नेता गमवला असल्याची' भावना व्यक्त केली आहे. 

लता मंगेशकर यांनीही जेटलींसोबतचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आशा भोसले, अनिल कपूर, अदनान सामी, सनी देओल, करण जोहर यांनीदेखील अरुण जेटलींच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे.

एम्स रुग्णालयाने एक पत्रक प्रसिद्ध करून अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी १२ वाजून ७ मिनिटांनी निधन झाल्याचे जाहीर केले. गेल्या काही दिवसांपूर्वी ६ ऑगस्ट २०१९ रोजी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय परराष्ट्र यांचे सुषमा स्वराज यांचे निधन झाले. या दोन नेत्यांच्या जाण्याने भारताने दिग्गज, अभ्यासू, संयमी नेते गमावले असल्याची भावना व्यक्त होत आहे.