'सिनेइंडस्ट्रीत माझी कोणीच मैत्रीण नाही, कॅमेऱ्यासमोर दिसते ते...; कला विश्वाबाबत आशा भोसलेंचा मोठा खुलासा

जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी नुकतीच एका  युट्यूब चॅनेलला  मुलाखत दिली. यात त्यांना तुमच्या जवळच्या मैत्रीणी कोण आणि तुमच्या आवडीनिवडी काय असे प्रश्न विचारले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या जवळच्या मैत्रींणींबद्दल खुलासा केला.   

Updated: Jul 24, 2024, 01:20 PM IST
'सिनेइंडस्ट्रीत माझी कोणीच मैत्रीण नाही, कॅमेऱ्यासमोर दिसते ते...; कला विश्वाबाबत आशा भोसलेंचा मोठा खुलासा title=

मराठी, बॉलिवूड आणि इतर भाषांमध्ये आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध कराणाऱ्या जेष्ठ गायिका म्हणजे आशा भोसले. बॉलिवूडचा सुवर्णकाळ त्यांनी खूपच जवळून अनुभवला. सिनेमातील नायिकेप्रमाणेच आशा भोसलेंच्या आवाजावर देखील आजचा प्रेक्षकवर्ग तेवढंच प्रेम देतो. नुकतंच आशा भोसले यांनी एका युट्यूब चॅनेलला  मुलाखत दिली.या मुलाखतीत आशा यांना त्यांच्या सिनेसृष्टीबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. या इंडस्ट्रीत तुमची जवळची मैत्रिण कोण असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर आशा भोसले म्हणाल्या की, 'मला फार मैत्रिणी नाहीत, ज्या आहेत त्यांचा इंडस्ट्रीशी काही संबंध नाही'. मला कामाचा व्याप इतका असायचा की, तसं कोणी इतकं जवळच झालंच नाही. मला इंडस्ट्रीत कोणीही जवळची मैत्रीण नाही.

जितकं कॅमेरासमोर सगळं छान दिसतं ते सगळंच खरं नसतं. या इंडस्ट्रीत प्रत्येकजण एकमेकांशी खोटं वागत असतो. जे मला जमत नाही. त्यामुळे सिनेविश्वात दोन स्त्रिया कधीच एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी होऊ शकत नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे. म्हणूनच कोणाशी मैत्री व्हावी असा विश्वास कोणाबद्दल वाटला नाही. सिनेविश्वाशी कामाव्यतिरिक्त कोणाशी जास्त संबंध आलाच नाही.माझं काम मी किती प्रमाणिकपणे करते आणि मला किती मेहनत घ्यायला हवी याकडे माझं जास्त लक्ष असायचं. त्यातल्या त्यात पूनम ढिल्लों हिच्याशी माझी चांगली मैत्री झाली. पद्मिनी कोल्हापूरे नात्याने माझी भाची असल्याने ती माझ्यासाठी खूप जवळची आहे. या दोघींशिवाय इंडस्ट्रीत फार कोणी माझ्या जवळच नाही. इंडस्ट्रीतील नामवंत कलाकारांच्या खूप पार्ट्या आजही होतात आणि तेव्हाही व्हायच्या. मी राज कपूर यांच्या 10 – 12 पार्ट्यांना गेले होते. बाकी कोणत्याही कलाकरांच्या पार्टीला जाणं मी टाळायचे. असं त्यांनी सांगितलं.  पुढे त्या असंही म्हणतात की, 'मला मैत्रीणी नाहीत, याचं मला कधीही वाईट वाटलं नाही.'

आशा भोसलेंची गाण्याव्यतिरिक्तही एक वेगळी ओळख आहे. त्या उत्तम स्वयंपाक करतात. दुबई, अबुदाबी सारख्या ठिकाणी त्यांच्या नावाचं 'आशा' रेस्टॉरंट आहे. या हॉटेलमध्ये उत्कृष्ट चवीचं नॉनव्हेज चाखायला खवय्यांची गर्दी असते. गोड आवाजाप्रमाणेच आशा भोसलेंच्या हाताला तितकीच छान चव देखील आहे. वेगवेगळे पदार्थ बनवून लोकांना खायला घालणं त्यांना खूप आवडतं असं त्यांनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.