close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सौमित्रची आई म्हणून कलाविश्वात तब्बल 40 वर्षांनी अभिनेत्रीचा कमबॅक

  'झी मराठी'वरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' 

Updated: Oct 10, 2019, 12:47 PM IST
सौमित्रची आई म्हणून कलाविश्वात तब्बल 40 वर्षांनी अभिनेत्रीचा कमबॅक

दक्षता ठसाळे, झी मीडिया, मुंबई :  'झी मराठी'वरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' यशाच्या शिखरावर आहे. गृहिणी ते उद्योजिका असा राधिकाचा यशस्वी प्रवास या मालिकेत दाखवला आहे. ही मालिका आता अगदी महत्वाच्या वळणावर आहे. 'राधिका' आणि 'सौमित्र' यांच लवकरच लग्न होणार आहे. असं असताना मालिकेत महत्वाच्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. ती म्हणजे सौमित्रची आई. सौमित्रची आई म्हणून प्रसिद्ध अभिनेत्रीने कलाविश्वात तब्बल 40 वर्षांनी कमबॅक केलं आहे.

सौमित्रची आई म्हणून अभिनेत्री वंदना पंडीत- शेठ यांनी अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं आहे.  वंदना पंडीत यांनी 40 वर्षांपूर्वी अभिनेता सचिन पिळगांवकर यांच्यासोबत 'अष्टविनायक' या सिनेमात काम केलं होतं. 'अष्टविनायका तुझा महिमा कसा' हे या सिनेमातील लोकप्रिय गाणं. या सिनेमात अभिनेता सचिन पिळगांवकर यांच्या पत्नीची भूमिका वंदना पंडीत यांनी साकारली होती. वंदना पंडीत यांनी यावेळी राजा गोसावी, सचिन पिळगांवकर, शरद तळवळकर यासारख्या कलाकारांसोबत काम केलं आहे. कमबॅकच्या निमित्ताने अभिनेत्री वंदना पंडीत-शेठ यांच्याशी 'झी २४तास'ने संवाद साधला.


21 वर्षांच्या असताना वंदना पंडीत-शेठ यांनी 'अष्टविनायक' या सिनेमात सचिन पिळगांवकर यांच्यासोबत काम केलं. त्यानंतर 'मुक्ता', 'मणी' सारख्या सिनेमांमध्ये छोट्या भूमिका साकारली. वंदना पंडीत यांचा पुण्यात व्यवसाय असल्या कारणाने त्या त्यामध्ये व्यस्त झाल्या. 'लग्नानंतर कौटुंबीक जबाबदाऱ्या आणि व्यवसाय यांमध्ये व्यस्त असल्यामुळे पुन्हा पडद्य़ावर काम करणं झालं नाही,' असं वंदना शेठ सांगतात.

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत नानींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुहिता थत्ते या वंदना शेठ यांच्या मैत्रिण आहेत. एकदा पुण्यात आमची कामानिमित्त भेट झाली तेव्हा तिने मला आता सध्या काय करतेस? असं विचारलं. 'चांगली भूमिका असेल तर मला अभिनयात पुन्हा एकदा काम करायला आवडेल असं मी तिला सांगितलं,' असं वंदना यांनी सांगितलं 

त्यानंतर पंधरा वीस दिवसांनी झी मराठीकडून त्यांना सौमित्रच्या आईच्या भूमिकेबाबत विचारण्यात आलं. भूमिका चांगली असल्यामुळे वंदना यांनी होकार दिला. आणि त्या शुटिंगकरता मुंबईत आल्या. 'मी तब्बल 40 वर्षांनी पुन्हा अभिनय करणार होते. सुरूवातीला दीड दिवस मला त्या सगळ्यात रूळायला गेला. पण सगळ्यांनी छान सांभाळून घेतलं. मी आता दोन पिढ्या मागे आहे. पण मालिकेतील तरूण कलाकारांनी मला खूप चांगले सांभाळून घेतले,' असं अभिनेत्री वंदना पंडीत-शेठ सांगतात. अशा पद्धतीने मालिका विश्वात येत वंदना पंडीत-शेठ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या.