अमित इंगोले, झी २४ तास, मुंबई : वडील आणि मुलांच्या नात्यावर आजवर हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये अनेक पद्धतीने भाष्य करण्यात आल्याचं बघायला मिळालं. आता पुन्हा एकदा हाच पण वेगळ्या धाटणीचा बाप आणि मुलांच्या हळव्या नात्याचा विषय फारच इंटरेस्टींग पद्धतीने ‘बापजन्म’मधून मांडण्यात आला आहे.
ट्रेलरवरून हा सिनेमा फारच कंट्रोल, नेहमीचा किंवा माहिती असलेला विषय असेल, असा अंदाज अनेकांसोबत मी सुद्धा लावला होता. मात्र या सिनेमाचा दिग्दर्शन इथे महत्वाचा ठरतो आणि हे समज पार बदलवून टाकतो. ट्रेलरच्या कितीतरी पुढे हा सिनेमा आहे. कदाचित, या विषयावर असा सिनेमा तुम्ही याआधी कधी बघितलाही नसेल किंवा एखादा बाप आपल्या मुलांच्या प्रेमापोटी असं काही करेल याचा विचारही केला नसेल.
निपुण धर्माधिकारी या तरूण आणि स्मार्ट कलाकाराचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा. हा त्याचा पहिलाच सिनेमा असला तरी, तो तसा या क्षेत्रात चांगलाच मुरलेला कलाकार आहे. नाटक, सिनेमा आणि वेब सीरीज अशा माध्यमांमधून तो सतत आपलं वेगळेपण जपत आला आहे. तेच त्याचं वेगळेपण याही सिनेमात ठळकपणे बघायला मिळालं.
ही कथा आहे भास्कर पंडीत आणि त्याच्या दोन मुलांची. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचं निधन झालंय. आता ते पुण्यात एकटेच राहतात. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगी बंगळुरूमध्ये तर मुलगा लंडनला असतो. दोघांचाही बापावर खूप राग आहे. त्यांनी एक फार मोठी गोष्ट पत्नी आणि मुलांपासून लपवून ठेवली आहे. त्या गोष्टीमुळेच त्यांच्या मुलांमध्ये त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यांना बापाचं तोंडही बघायचं नाहीये. अशात आता त्यांच्या रुटीन लाईफला एक मोठं वळण मिळालं आहे.
त्यामुळे आता त्यांना त्यांच्यापासून दुरावलेल्या मुलांना एकदा भेटायचं आहे. त्यांना हे माहिती आहे की, त्यांची मुलं भेटणार नाहीत. पण तरीही ते एक शेवटचा प्रयत्न म्हणूण मुलांना एकदा भेटण्यासाठी एक मिशन तयार करतात. हे मिशन खूपच सुखावणारं आहे. कारण ते आजच्या काळाशी मेळ असणारं आहे. आता ते मिशन काय आहे? त्यांची मुलं त्यांना भेटायला येतात का? त्यासाठी ते काय करतात? हे सगळं सिनेमात बघण्यात जी मजा ती इथे सांगण्यात अजिबात नाहीये. ते बघून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल हे नक्की.
आधी म्हटल्याप्रमाणे हा सिनेमा वडील आणि मुलांच्या नात्यावर भाष्य करणारा असाच वाटला होता. आणि तो तसाच आहे. पण हे साधं कथानक इतकं इंटरेस्टींग आणि वेगळ्या पद्धतीने दाखवलं जाईल याची कल्पनाही केली नव्हती. पहिल्या फ्रेमपासून ते शेवटपर्यंत सिनेमा खिळवून ठेवतो. काय होणार आहे हे माहिती असतं, पण ते कसं होणार आहे. याची उत्सुकता लागून राहते. इंटरव्हलआधी सिनेमा फारच फास्ट आणि वेगाने कथानक पुढे नेतो. यात भास्कर पंडीत यांचा भूतकाळ आणि भविष्यकाळ डेव्हलप करण्यात आलाय. तर इंटरव्हलनंतर भास्कर पंडीत आणि त्यांची मुलं यांच्यात नेमकं काय झालंय? काय मतभेद आहेत? ते कसे दूर केले जातात? हे सगळं आलंय.
दोन्हीही भाग मस्त जुळून आले आहेत. यात ए टू झेड सगळंच चांगलंच आहे असं नाहीये. भास्कर पंडीत मुलाला त्यांच्या ‘तसं’ वागण्याचं स्पष्टीकरण देतात, तो सीन जरा जास्त लांबल्यासारखा वाटतो. आणखीही एक दोन गोष्टी आहेत. त्या सोडल्या तर कुठेही सिनेमाचा आनंद घेण्यात खंड पडत नाही. भावनिक कथानक असूनही पूर्णपणे सिरीअस मोड यात नाही. जबरदस्त कॉमेडीच्या माध्यमातून मस्त हसतं खेळतं वातावरण ठेवण्यात आलंय.
निपुण धर्माधिकारी यानेच दिग्दर्शनासोबतच या सिनेमाचं लेखनही केलं आहे. दिग्दर्शन, संवाद आणि पटकथा लेखन या तिन्ही जबाबदा-या त्याने लिलया पेलल्या आहेत. पहिल्याच बॉलवर त्याने सिक्सर लगावला असेही म्हणता येईल. जितकं चांगलं लेखन निपुणने केलंय, तितकंच चांगलं दिग्दर्शन त्याने केलंय. अशाप्रकारचे विषय जनरली एका क्लासकडूनच बघितले जातात. पण ज्या पध्दतीने या विषयाची मांडणी करण्यात आली, ती पाहता हे विषय क्लासकडून नाही तर मासकडूनही नक्की बघितले जातील. निपुणने एका बापाच्या आयुष्यातील चढउतार फारच मार्मिकपणे पडद्यावर मांडले आहेत.
उगाच कुठेही काहीही न वापरता प्रत्येकचा फ्रेमला अर्थ देण्यात आलाय. कोणताही फापट पसारा या सिनेमात दिसत नाही. नेमकं आणि मोजकं तितक्याच सोप्या-साध्या पद्धतीने त्याने समोर मांडलं आहे. त्यासाठी निपुणचे करावे तितके कौतुक कमीच. डायलॉग फारच उत्तम आणि मजेदार झाले आहेत.
या सिनेमात मोजकीच पात्रे आहेत. यात सर्वात महत्वाची भूमिका ही सचिन खेडेकर यांनी वठवली आहे. सचिन खेडेकर हे भास्कर पंडीतची भूमिका अक्षरश: जगले आहेत. भास्कर पंडीत ही भूमिका सचिन खेडेकर इतक्या संयतपणे आणि स्टाईलने दुसरं कुणी साकारू शकलं असतं असंही वाटत नाही. अनेक ठिकाणी एकही डायलॉग न बोलता त्यांनी केवळ एक्सप्रेशनने सीन खाऊन टाकले आहेत. त्यांच्यानंतर लक्षात राहणारी दुसरी भूमिका म्हणजे पुष्कराज चिरपुटकर याची. त्याने मस्त काम केलंय. त्यांच्यासोबतच शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि अकर्श खुराणा यांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका चोख साकारल्या आहेत.
एकंदर या काय तर ‘बापजन्म’ ही बाप माणसांची बाप कलाकृती आहे. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. दिग्दर्शन, लेखन, अभिनय, संगीत, छायाचित्रण, संकलन या सर्वच पातळ्यांवर हा सिनेमा भरभरून मनोरंजन करतो. इतका हळवा विषय अगदी सहजतेने आणि मजेदार पद्धतीने आपल्या समोर येतो. यासोबतच कथा सांगण्याची निपुणची जी स्टाईल आहे ती या सिनेमाचं खास आकर्षण ठरते. त्यामुळे हा सिनेमा सर्वांनी एकदा नक्कीच बघावा.