कंगनाला निवडणुकीत उभं केलं तर....; बच्चू कडूंनी उडवली खिल्ली

एका अभिनेत्रीमुळं ....

Updated: Sep 16, 2020, 12:29 PM IST
कंगनाला निवडणुकीत उभं केलं तर....; बच्चू कडूंनी उडवली खिल्ली
छाया सौजन्य- सोशल मीडिया

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री kangana ranaut कंगना राणौत हिला ग्रामपंचायत निवडणुकीत उभे केले तर डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका करत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी करत तिची खिल्ली उडवली आहे.

मागील काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध अभिनेत्री कंगना हा वाद चांगलाच पेटला आहे. कंगना रोज ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर टीकास्त्र सोडत आहे. तर, तिच्यावरही होणाऱ्या टीकांचं प्रमाण काही कमी नाही. अशातच सरकार स्थापनेला शिवसेनेला पाठिंबा देणारे प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांनी सुद्धा बॉलिवूडच्या या बहुचर्चित 'क्वीन'वर निशाणा साधला आहे. 

'एका अभिनेत्रीमुळं राज्यातील सरकार कोसळण्याचा प्रश्नच येत नाही. कारण शिवसेनाचा वाघ तिथं बसला आहे,' अस बच्चू कडू म्हणाले. माध्यमांनीही या अशा अभिनेत्रीला इतकी किंमत देण्याची गरज नाही, जिची कवडिची ही किंमत नाही असा संतप्त सूर त्यांनी आळवला. इतकंच नव्हे तर, कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीला उभे केले, तर तिचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत त्यांनी तिच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. 

 

एखाद्या व्यक्तीचे कोणते सामाजिक काम नाही, कोणत्या समाजासाठी काम नाही अशा अभिनेत्रीला हाताशी धरून जर भाजप घाणेरडं राजकारण करत असेल, तर ते चुकीचं आहे असं म्हणत त्यांनी भाजपवरही निशाणार साधला.