बॉलिवूडचे 'गोल्ड मॅन' बप्पी लहरी यांचं निधन

तरुणाईला थिरकायला भाग पाडणारे बप्पी दा काळाच्या पडद्याआड...   

Updated: Feb 16, 2022, 08:41 AM IST
बॉलिवूडचे 'गोल्ड मॅन' बप्पी लहरी यांचं निधन  title=

मुंबई : हिंदी कलाविश्वात डिस्कोवर आधारित संगीत साकारत सर्वांनात आपल्या तालावर थिरकायला भाग पाडणारे संगीतकार, गायक बप्पी लहरी यांनी वयाच्या 69 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.

मुंबईतील रुग्णालयात बप्पी दा यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. 

क्रिटीकेअर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

दरम्यान, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर बप्पी दा यांच्या रुपात आणखी एक दिग्गज कलाकार या कलाजगतानं गमावला. या बातमीवर स्या बॉलिवूड आणि संगीत जगतातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

1970-80 च्या दशकात बप्पी लहरी यांनी बॉलिवूडमध्ये त्यांची जादू आणि दमदार कामगिरी दाखवून दिली. 'चलते चलते', 'डिस्को डांसर', 'शराबी' हे त्यांनी संगीत दिलेले काही लोकप्रिय चित्रपट. 

 'बागी 3' या चित्रपटासाठी त्यांनी संगीतबद्ध केलेलं 'बंकस' हे गाणं त्यांनी साकारलेली अखेरची कलाकृती ठरली. 

रुग्णालयात असण्याचं कारण काय? 
सूत्रांच्या माहितीनुसार बप्पी दा साधारण एक महिन्यापासून रुग्णालयात होते. सोमवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यातही आलं. पण , प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

बप्पी लहरी यांना अनेक व्याधींनी ग्रासलं होतं. OSA (ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया) यामुळे त्यांचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे.