‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे यांचा मोबाईल 'असा' चोरला, कथन केला प्रसंग

  ‘चला हवा येऊ द्या’ फेम प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) यांना एका वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले.  

Updated: Aug 8, 2020, 11:17 AM IST
 ‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे यांचा मोबाईल 'असा' चोरला, कथन केला प्रसंग title=
छाया सौजन्य : भारत गणेशपुरे फेसबुक

मुंबई : 'झी मराठी' वाहिनीवरील कार्यक्रम  ‘चला हवा येऊ द्या’ फेम प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) यांना एका वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले. ते आपल्या गाडीत असताना पश्चिम दृतगतीमार्गावर कांदिवली येथे एका टोळक्याने त्यांचा मोबाईल लांबविला. हा प्रसंग त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत सांगितला आहे. तसेच त्यांनी सगळ्यांना गाडीतून प्रवास करताना सावधान राहा, असे आवाहन केले आहे. तुम्हाला कोणी निर्दयी म्हटले तरी तुम्ही गाडीच्या काचा खाली घेऊ नका, असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबईत दोन दिवस तुफान पाऊस कोसळत होता. कांदीवली येथे वाहतूक कोंडी असताना भारत गणेशपुरे यांनी आपली कार उभी केली होती. यावेळी एका टोळीने मदत मागण्याचे नाटक केले. गाडीच्या काचेवर टकटक केली आणि दुसऱ्या बाजुने काही लोकांनी दरवाजा उघड त्यांचा मोबाईल चोरला. मोबाईल चोरीचा हा अनुभव स्वतः भारत गणेशपुरे यांनीच व्हिडिओ शेअर करत सांगितला आहे. तसेच सर्व नागरिकांना असे काही घडले, तर सावध राहा, असे सांगायला ते विसरलेले नाहीत. 

'आज माझा मोबाईल लुटून नेला आहे. ही घटना कांदिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या फ्लाय ओव्हरवर घडली. दरड कोसळल्यामुळे तेथे खूप पाऊस होता, खूप ट्रॅफिक होते. त्यावेळी दोन माणसे आली आणि त्यांनी खूप विचित्र पद्धतीने माझी गाडी ठोठावली, मात्र तरीही मी काच उघडली नाही. मात्र, माझ्या दुसऱ्या बाजूला असलेल्या माणसाने कारचा दरवाजा उघडला. त्याक्षणी त्या व्यक्तीने ओकारी काढण्याचे नाटक केले. त्याचवेळी माझ्या बाजूने एक माणूस आला आणि काच वाजवली. मी त्याच्याकडे पाहिले, तर तितक्यात ओकारी काढणाऱ्या माणसाने माझा मोबाईल चोरुन नेला.', असा प्रसंग या व्हिडिओतून व्यक्त केला आहे.

'तुम्हाला कोणी निर्दयी म्हटले तर म्हणून द्या'

 माझ्यासोबत ही घटना घडली आहे. मात्र, तुम्ही सतर्क राहा. सध्या कोरोनाची स्थिती आहे. कोरोनामुळे फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. जर तुमच्यासोबत अशापद्धतीची घटना घडली तर आधी तुमची गाडी बंद (लॉक) करा. काच उघडू नका. तुम्हाला कोणी निर्दयी म्हटले तरी म्हणून द्या. दिवस वाईट आहेत. प्रवास करताना महिला, लहान मुले असतात त्यामुळे तुम्ही योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, असे भारत गणेशपुरे म्हणाले.