मुंबई : एकीकडे दिवाळीचा सण आला आहे. सगळे लोक देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जात आहेत. तर दुसरीकडे भोजपुरी स्टार खेसारी लाल यादव पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बूट घालून मंदिराच्या दरवाज्यावर लाथ मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ शूटिंगचा भाग असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या या वादग्रस्त व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत नेटकऱ्यांनी ट्विटरवर खेसारी लाल यादव याचा विरोध केला आणि मुख्यमंत्री पोर्टलवर पण त्याच्या विरोधात तक्रारही केली.
हे प्रकरण गोरखपूरच्या पिपराइच नगर पंचायतीमधील भगवान मोतेश्वर नाथ मंदिरातील आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ हा शूटिंगचा भाग असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये तो मंदिराच्या गेटला लाथ मारून आत शिरताना दिसत आहे. खेसारी लाल यादव मंदिरात प्रवेश करतो आणि गुंडांची मारहाण करतो. मात्र, यावेळी मंदिराच्या गेटवर लाथ मारण्याच्या दृश्यांकडे लोकांचे लक्ष गेले आणि त्यांनी त्याचा निषेध करण्यास सुरुवात केली.
लोकांनी अभिनेत्याच्या या व्हिडिओवर आक्षेप घेतला आणि हिंदूंच्या भावना दुखावल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी हा विरोध पाहता भोजपुरी स्टार खेसारी लाल यादव यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त दिली आहे. खेसारी लाल यादव म्हणाला की, त्यानं हे मुद्दामून केल नाही. त्याला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. या व्हिडिओचा दुसरा अँगल व्हायरल केला जात असल्याचा आरोपही त्यानं केला आहे. तर सत्य हे आहे की या दृश्यात मंदिराचा दरवाजा उघडण्यासाठी दाराला दोरीनं बांधलेलं होतं जे आणखी दोन लोक खेचून उघडतात.
खेसारी लाल यादवचा हा व्हिडिओ पाहून गोरखपूरच्या पिपराइच येथील रहिवासी वेदप्रकाश पाठक यांनी त्यांच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री जनसुनवाई पोर्टलवर तक्रार केली. या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. रिपोर्ट्सनुसार, या तक्रारीनंतर पिपराइचच्या एसएचओला तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे.