एक 67 वर्षीय मलेशियन महिला सात वर्षे चाललेल्या ऑनलाइन प्रेम घोटाळ्याची बळी होती. ज्यामध्ये तिने सुमारे 4.4 कोटी रुपये गमावले.परंतु ती कधीही तिच्या कथित जोडीदाराला भेटली नाही. हे खळबळजनक प्रकरण आयुक्त दातुक रामली मोहम्मद युसूफ मलेशियाच्या बुकित अमन कमर्शियल क्राइम इन्व्हेस्टिगेशन विभागाचे संचालक यांनी 17 डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत मांडले. हा प्रकार इतका धक्कादायक आहे की, या महिलेला जवळपास 7 वर्षे फसवण्यात आलं.
हा घोटाळा ऑक्टोबर 2017 मध्ये सुरू झाला, जेव्हा महिलेने फेसबुकवर एका व्यक्तीशी संपर्क साधला ज्याने आपली ओळख अमेरिकन व्यापारी म्हणून सांगितली. पण महिलेचा विश्वास जिंकण्यासाठी या व्यक्तीला जास्त वेळ लागला नाही. कारण या महिलेने महिन्याभरातच ऑनलाइन व्यवहार सुरू केले. दरम्यान, घोटाळेबाजाने त्या महिलेकडे मदत मागितली. मलेशियामध्ये स्थलांतरित करण्यात आर्थिक अडचणी येत असल्याच सांगत त्या व्यक्तीने प्रथमच RM 5,000 (अंदाजे 90,000 रुपये) मागितले.
कालांतराने, हा घोटाळेबाज वैयक्तिक आणि व्यावसायिक अडचणीच्या बहाण्याने महिलेकडून पैशाची मागणी करत राहिला. या कालावधीत, महिलेने एकूण 306 बँकांमधून 50 वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे पाठवले. ज्यामुळे एकूण 2,210,692.60 RM (अंदाजे 4.4 कोटी रुपये) चे नुकसान झाले. महिलेने यातील बरीच रक्कम तिच्या मित्र आणि कुटुंबीयांकडून उधार घेतली होती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही महिला या व्यक्तीशी कधीही भेटली नव्हती आणि बोललीही नव्हती. दोघांमध्ये फक्त फोन कॉल्स होते आणि घोटाळेबाज नेहमी व्हिडिओ कॉल किंवा मीटिंग टाळत असे, त्यासाठी तो कायमच त्या महिलेले वेगवेगळे बहाणे देत असे.
नोव्हेंबर 2024 मध्ये, महिलेने या प्रकरणाबद्दल एका मित्राला सांगितले. महिलेच्या सांगण्यावरुन मित्राला अंदाज आला की, हा मोठा घोटाळा आहे. या घटनेनंतर, मलेशियाच्या अधिका-यांनी लोकांना ऑनलाइन नातेसंबंधांच्या बाबतीत, विशेषत: जेव्हा कोणतेही आर्थिक व्यवहार गुंतलेले असतात तेव्हा सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. आर्थिक व्यवहारांची मागणी करणारे ऑनलाइन संबंध टाळण्याचे आवाहनही आयुक्त रामली यांनी सर्वसामान्य जनतेला केले आहे. ही घटना एक चेतावणी आहे की, स्कॅमर त्यांच्या पद्धतींमध्ये अधिकाधिक अत्याधुनिक होत आहेत आणि ऑनलाइन संबंधांद्वारे लोकांना लक्ष्य करत आहेत.