मुंबई : 'बिग ब्रदर'वरून प्रेरणा घेऊन भारतामध्ये 'बिग बॉस' सुरू झाले. हिंदीप्रमाणेच आता हा रिएलिटी शो आता अनेक भारतीय भाषांमध्ये सुरू झाला आहे. नुकतेच मराठीमध्येही पहिल्यांदा बिग बॉस रसिकांच्या भेटीला आला आहे. मराठीतील पहिल्या बिग बॉसच्या पर्वाचं पहिलं एलिमेशन नुकतच रविवारी पार पडलं. 15 मराठी सेलिब्रिटींमध्ये हा खेळ रंगत आहे.
विकेंडचा डावमध्ये होस्ट महेश मांजरेकर घरातील सदस्यांना भेटतात. त्यांच्या आठवडाभरातील कामगिरीची 'शाळा' घेतात. त्यानुसार पहिल्या आठवड्यात पहिलं एलिमेशन झालं.
आरती सोलंकी या अभिनेत्रीचं बिग बॉसच्या घरातून पहिलं एलिमेशन झालं आहे. आरती सोलंकी सोबत उषा नाडकर्णी, अनिल थत्ते, भूषण कडू, स्मिता गोंदकर आणि ऋजुता धर्माधिकारी हे नॉमिनेट झाले होते. मात्र प्रेक्षकांच्या कौलानुसार पहिल्याच आठवड्यात आरती सोलंकी बाहेर पडली आहे.
घरातून बाहेर पडणार्या सदस्याला पुढील आठवड्यात एका व्यक्तीला सुरक्षित ठेवण्याची खास पॉवर मिळते. त्यानुसार आरती सोलंकीने घरातून बाहेर पडल्यानंतर उषा नाडकर्णींना सुरक्षित केलं आहे.
पहिल्या आठवड्यात नशीबाची साथ मिळाल्याने विनीत बोंडे कॅप्टन झाला होता. मात्र अवघ्या काही दिवसातच घरातील सदस्यांच्या एकमताने नवा कॅप्टन निवडण्याची संधी बिग बॉसने स्पर्धकांना दिली, त्यानुसार आस्ताद काळेची नवा कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली.