'गदर 2'चं यश साजरं करणाऱ्या देओल कुटुंबावर दु:खाचा डोंगर, कुटुंबातील सदस्याचं निधन

सनी देओलची मुख्य भूमिका असणाऱ्या 'गदर 2' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळालं आहे. यानंतर देओल कुटुंब सध्या हे यश साजरं करण्यातच व्यग्र आहे. पण त्यातच आता देओल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 5, 2023, 04:45 PM IST
'गदर 2'चं यश साजरं करणाऱ्या देओल कुटुंबावर दु:खाचा डोंगर, कुटुंबातील सदस्याचं निधन title=

अभिनेता सनी देओलची मुख्य भूमिका असणाऱ्या 'गदर 2' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळालं आहे. गदर 2 चित्रपटाने 500 कोटींचा टप्पा गाठला असून, सुपरहिट ठरला आहे. यामुळे देओल कुटुंबात सध्या आनंदाची लाट असून, हे यश साजरं केलं जात आहे. पण हा आनंद साजरा होत असतानाच एक वाईट बातमी आली आहे. बॉबी देओलची सासू मर्लिन आहूजा (Marlene Ahuja) यांचं निधन झालं असून, देओल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मर्लिन मागील अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. रविवारी संध्याकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला. 

तान्याच्या आईचं निधन

बॉबी देओल आणि तान्या आहुजा यांचं 30 मे 1996 रोजी लग्न झालं. मर्लिन आहुजा या तान्याच्या आई असून, गेल्या अनेक काळापासून आजारी होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. या आजारपणातच रविवारी त्यांचं निधन झालं. मर्लिन आहुजा यांनी तीन मुलं आहेत. तान्या व्यतिरिक्त विक्रम आहुजा आणि मुनिषा आहुजा अशी दोन मुलं आहेत. तान्या यांची आई मुंबईतच वास्तव्यास होती. 

शनिवारी देओल कुटुंब सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये आनंद लुटत होतं. पण तान्या आईच्या आजारपणामुळे या पार्टीत सहभागी झाली नव्हती. आता संपूर्ण देओल कुटुंब मर्लिन यांच्या निधनानंतर शोकात बुडालं आहे. 

मर्लिन एक उद्योजिका होत्या

मर्लिन या एका उद्योजक कुटुंबाशी संबंधित होत्या. त्यांचे पती देवेंद्र आहुजा हे सेंच्यूरियन बँकेत टॉप बँकर होते. तसंच ते गुंतवणुकदारही होते. तसंच मर्लिन यांचे पती सेंन्च्यूरी फायनान्स लिमिटेडमध्ये मॅनेजिंग डायरेक्टरही होते. 

मर्लिन स्वत:देखील एक उद्योजिका होत्या. त्यामुळे तान्याचाही सुरुवातीपासून उद्योगात रस होता. तान्याने मुंबईतूनच आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. फॅशनसह ती एक इंटिरियर डिझायनरही आहे. तान्याचा स्वत:चा 'द गुड अर्थ' नावाचा एक फर्निचर ब्रांड आहे. बॉबीच्या पत्नीने 'जुर्म' आणि 'नन्हे जैसलमेर' या चित्रपटांसाठी कॉस्ट्यूम डिझाइनही केलं आहे. 

बॉबी देओल आणि तान्या देओल यांना आर्यमन आणि धरम देओल अशी दोन मुले आहेत. बॉबी आणि तान्या यांची गणना बॉलिवूडमधील सर्वात लाडक्या जोडप्यांमध्ये केली जाते. कामाबद्दल बोलायचं गेल्यास, बॉबी शेवटचा आश्रम वेब सीरिज आणि विक्रांत मेस्सी व सान्या मल्होत्रासोबत 'लव्ह हॉस्टेल'मध्ये दिसला होता. लवकरच बॉबी रणबीर कपूरसोबत अॅनिमल चित्रपटात दिसणार आहे. तसंच हरी हरा वीरा मल्लू या तेलुगू चित्रपटातही झळकणार आहे.