मुंबई : अभिनेता आमिर खान, याच्या नावाभोवती असणारं प्रसिद्धीचं वलय पाहणं किंवा त्याला या वर्तुळात वावरताना पाहणं म्हणजे चाहत्यांसाठी परवणी. रुपेरी पडद्यावर आमिरनं कायमच विविध भूमिका साकारत त्याला परफेक्शनिस्ट का म्हटलं जातं हे सिद्ध केलं. आता म्हणे त्यानं खासगी आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. (aamir khan)
आमिरनं सर्वप्रथम रिना दत्ता हिच्याशी लग्न केलं. पण, 16 वर्षांनंतर त्यांच्या या वैवाहिक नात्याला तडा गेला. यानंतर त्याने किरण राव हिच्याशी सहजीवनाचा प्रवास सुरु केला. या लग्नातून आमिर आणि किरणनं आझाद, या मुलाचं पालकत्त्वं स्वीकारलं.
किरणसोबतचं त्याचं नातंही फार काळ टीकलं नाही. 15 वर्षानंतर त्यांच्याही नात्यात ठिणगी पडली. आपल्या खासगी आयुष्यात नेमकं कुठे बिनसलं याचा खुलासा आता खुद्द आमिरनंच एका मुलाखतीत केला.
'कुठेतरी मी जबाबदाऱ्या नीट पूर्ण करु शकलो नाही. मला पालकांपासून सुरुवात करावी लागेल. त्यानंतर माझी भावंड, माझी पहिली पत्नी, रीना, किरण, रीना- किरण यांचे पालक, माझी मुलं ही सर्वच माणसं माझ्या हृदयाच्या जवळची आहेत', असं आमिर म्हणाला.
मी या कलाजगतात आलो, यामध्ये एकरुप झालो, मला खूप काही शिकायचं होतं. पण, आज मला हे लक्षात येतं की माझ्या हृदयाच्या जवळ असणाऱ्या या लोकांना मी त्यांना अपेक्षित वेळ देऊ शकलो नाही, असं आमिर म्हणाला.
प्रेक्षकांशी नातं जुळवताना तो वैयक्तिक आयुष्यातील नाती मात्र विसरत गेला. 'मी माझा सर्व वेळ कामाला दिला आणि ते नातं अधिक घट्ट केलं. मला वाटायचं की माझं कुटुंब नेहमीच माझ्यासोबत असेल. मला तेव्हा फक्त प्रेक्षकांची मनं जिंकायची होती, मी हरपून गेलो होतो. मी इतका हरवलो की आपल्यासाठी कुणीतरी वाट पाहणारं आहे हेसुद्धा मी विसरलो', असंही आमिरनं स्पष्ट केलं.
नात्यांची विण आणखी घट्ट करण्यासाठी त्यांना अपेक्षित वेळ दिला जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पण, आमिरला ते शक्य झालं नाही आणि तिथंच सर्व गणितं बिनसली.