माझ्यावर रागवण्याची प्रेक्षकांना संधीच मिळाली- आमिर खान

'ठग्स...'च्या अपयशाविषयी आमिर म्हणतो.....  

Updated: Jan 29, 2019, 10:31 AM IST
माझ्यावर रागवण्याची प्रेक्षकांना संधीच मिळाली- आमिर खान title=

मुंबई : विविध चित्रपट आणि त्यातील तितक्याच बहुविध भूमिका साकारत अभिनेतचा आमिर खान याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्याने साकारलेल्या बहुतांश भूमिकांची प्रेक्षकांनीही नेहमीच प्रशंसा केली आहे. पण, २०१८ म्हणजेच मागील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या त्याच्या मल्टीस्टारर चित्रपटाला मात्र ती जादू कायम ठेवता आली नाही. 

आमिर खान, अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख, कतरिना कैफ अशी कलाकारांची फळी असणारा हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच चाहत्यांच्या निशाण्यावर होता. चित्रपटाविषयी येणाऱ्या याच प्रतिक्रिया पाहता रसिकांना आपल्यावर रागवण्याचा पूर्ण अधिकार असल्याचील बाब खुद्द 'परफेक्शनिस्ट' आमिरने स्पष्ट केली. 

स्वत:च्याच निर्मिती संस्थेअंतर्गत साकारलेल्या 'रुबरू रोशनी' या प्रोजेक्टच्या प्रसिद्धीसाठी माध्यमांशी संवाद साधतेवेळी आमिरने त्याची प्रतिक्रिया दिली. 'आतापर्यंत मी सर्व चांगल्या दिग्दर्शकांसोबतच काम केलं आहे. चित्रपचट साकारण्याचे त्यांचे हेतूही तितकेच चांगले असतात. एक चांगला चित्रपट साकारण्याकडेच आमचं लक्ष असतं. मुळाच चित्रपट साकारणं हे एक कठिण काम आहे. हे एक सांघिक काम आहे आणि मी त्या संघातील एक खेळाडू. त्यामुळे जर माझ्या दिग्दर्शकाकडून काही चूक झाली तर त्याच्यासोबतच ती माझीही चूक असते', असं आमिर त्या मुलाखतीत म्हणाला. 

चुकांतूनच माणूस शिकतो असं म्हणत प्रेक्षक माझ्या नावाखातर चित्रपट पाहण्यासाठी आले, आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी ही सर्वतोपरी आपली असल्याची बाब त्याने स्वीकारली. चित्रपट आवडला असं सांगणारी मंडळीही आपल्याला भेटल्याचं सांगत चित्रपट आवडला नसल्याचंही ते तितक्याच हक्काने सांगू शकतात असं तो म्हणाला.

गेल्या काही काळात आपल्या एकाही चित्रपटाला फारसं अपयश आलं नव्हतं. त्यामुळे एका अर्थी 'ठग्स.....' च्या अपयशाच्या निमित्ताने प्रेक्षकांना त्यांच्या मनात असणारा राग व्यक्त करण्याची संधीच मिळाली आणि त्यांनी तसं केलंही, असं म्हणत आमिरने प्रेक्षकांसोबतचं त्याचं खास नातं सर्वांसमोर ठेवलं. चित्रपटाच्या वाट्याला येणाऱ्या यशासोबतच अपयशही तितक्याच सकारात्मक वृत्तीने स्वीकारण्याचा त्याचा हाच अंदाज खऱ्या अर्थाने त्याला 'परफेक्शनिस्ट' ठरवतो.