खिलाडी कुमारची आणखी एक किमया पाहिली?

सोशल मीडियाच्या माध्यमातून देतोय 'हे' चॅलेंज 

Updated: Jul 4, 2019, 09:41 AM IST
खिलाडी कुमारची आणखी एक किमया पाहिली?  title=

मुंबई : काही साहसीदृश्यांचा विषय निघाला आणि कोणा एका सेलिब्रिच्या नावाची निवड करण्यास सांगितलं, कर लगेचच अभिनेता अक्षय कुमार याच्या नावाला पसंती दिली जाते. 'खिलाडी कुमार' म्हणून कलाविश्वात नावारुपास येणारा हा अभिनेता फक्त अभिनयच नव्हे, तर साहसी दृश्यांमध्येही त्याचं कसब पणाला लावताना दिसतो. व्यायाम प्रकारांपासून ते आव्हानांचा स्वीकार करण्यापर्यंत त्याची सरशी असते. असा हा खिलाडी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना एक 'चॅलेंज' देत आहे.  

२०१८ मध्ये चर्चेत असणाऱ्या #Kikichallenge मागोमाग सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे ते म्हणजे  #BottleCapChallenge. बाटलीचं झाकण एका पायाच्या सहाय्याने उघडण्याचं हे आव्हान. रिव्हर्स किकच्या सहाय्याने, बाटली न फोडता झाकण उघडण्याची किमया दाखवण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. 

सेलिब्रिटींनीसुद्धा हे  #BottleCapChallenge चांगलंच मनावर घेतलं असून ये यशस्वीपणे स्वीकारलंही आहे. जेसन स्टॅटहॅम, जॉन मेयर आणि डिप्लो यांनी सोशल मीडियावर हे चॅलेंज पूर्ण केल्याचे व्हिडिओही पोस्ट केले. यामध्येच आचा अक्षयचंही नाव जोडलं गेलं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार अफलातून अशी रिव्हर्स किक मारत बाटलीचं झाकण उघडत आहे. असं करताना त्याच्या व्यक्तीमत्वातून झळकणारा आत्मविश्वास पाहण्याजोगा आहे. 

'साहसी दृश्यांसाठी मला प्रेरणास्थानी असणाऱ्या जेसन स्टॅटहॅम यांनी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मीसुद्धा असा व्हिडिओ पोस्ट करत आहे. चला तर मग, तुम्हीही हे चॅलेंज स्वीकारा. बाटली आणि तुमचा पाय हवेत असूद्या.... सर्वात चांगला व्हिडिओ मी माझ्या अकाऊंटवरुन रिपोस्ट/ रिट्विट करणार आहे. चलाssss', असं कॅप्शन त्याने हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं. 

सोशल मीडियावर सध्या अनेकांनीच हे चॅलेंज स्वीकारण्यास सुरुवात केली असून, त्याविषयीचे व्हिडिओ पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, जेसन स्टॅटहॅम, जॉन मेयर यांचेही व्हिडिओ चांगलेच चर्चेत आले आहेत.