पत्नीला खास दिवसाच्या शुभेच्छा देत ज्येष्ठ अभिनेत्याकडून लग्नातील फोटो शेअर

प्रिय पत्नीस.... 

Updated: Aug 26, 2019, 11:19 AM IST
पत्नीला खास दिवसाच्या शुभेच्छा देत ज्येष्ठ अभिनेत्याकडून लग्नातील फोटो शेअर  title=

मुंबई :  हिंदी कलाविश्वात जेथे नात्यांविषयी अनेकदा कोणतीही शाश्वती दिली जात नाही, अशा या विश्वात काही नाती मात्र या समजुतींना मोठ्या अनोख्या अंदाजात मोडीत काढतात. असंच एक नातं आहे, बी- टाऊनमधील एका अशा सेलिब्रिटी जोडीचं ज्यांनी त्यांच्या जीवनातील ३४ वर्षांचा काळ एकमेकांच्या साथीने व्यतीत केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच त्यांच्या नात्यातील या खास दिवसाची माहिती समोर आली आहे. ही जोडी म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री किरण खेर. 

अचानक या जोडीविषयी चर्चा होण्यामागचं निमित्तही तसंच आहे. कारण, ते साजरा करत आहेत त्यांच्या सहजीवनाची ३४ वर्ष. खुद्द अनुपम खेर यांनीच या खास दिवसाचं निमित्त साधत पत्नी, अभिनेत्री आणि राजकीय पटलावर वावर असणाऱ्या त्यांच्या सहचारिणीला शुभेच्छा दिल्या आहेत. 

जवळपास ३४ वर्षांपूर्वीचाल लग्नसमारंभातील एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी किरण खेर यांच्यासाठी काही ओळीही लिहिल्या आहेत. जे पाहता अनुपम यांच्या आयुष्यात असणारं किरण यांचं स्थान लक्षात येत आहे. 

'प्रिय किरण.....! लग्नाच्या ३४व्या वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा. आपण जीवनातील बराच काळ एकमेकांच्या साथीने व्यतीत केला. ३४ वर्षे मागे लोटली. पण, सारंकाही कालपरवाच घ़डल्यासारखं वाटत आहे', असं म्हणत आपल्या सहजीवनाविषयी त्यांनी मनोगत व्यक्त केलं. अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये ते आणि किरण खेर हे नववधू- वराच्या रुपात एकमेकांना अगदी शोभून दिसत आहेते.