मुंबई : एक अभिनेता म्हणून रणवीर सिंग जसा प्रेक्षकांची मनं जिंकतो, त्याचप्रमाणे एक मित्र किंवा सहकलाकार म्हणूनही तो तितकाच प्रभावीपणे आपल्यासोबत असणाऱ्या व्यक्तीची साथ देतो. आता म्हणे बी-टाऊनचा हा हरहुन्नरी अभिनेता 'मॅच मेकर' झाला आहे. सैफ अली खान याची लेक सारा अली खान हिच्यासाठी रणवीरने कलाकारांच्या गर्दीतून एका खास व्यक्तीला थेट तिची भेट घडवून आणण्यासाठी बोलवलं.
नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान, रणवीरने सारा अली खान हिचा क्रश असणाऱ्या कार्तिक आर्यनशी तिची भेट घडवून आणली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये रणवीर सारा आणि कार्तिकची भेट घडवून आणताना दिसत असून तो त्यांची खिल्लीही उडवताना दिसत आहे.
साराही कार्तिकला भेटून या व्हिडिओमध्ये आनंदात दिसत असून, रणवीरचा हा अंदाज तिला आणि कार्तिकलाही भावला असणार असं म्हणायला हरकत नाही. 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात कार्तिक एक अभिनेता म्हणून आपल्याला आवडत असल्याचं म्हटलं होतं. ज्यानंतर सारा तुला डेट करु इच्छिते यावर तुझी काय प्रतिक्रिया आहे, असा प्रश्न कार्तिकला एका कार्यक्रमात विचारण्यात आला होता. तेव्हा डेटिंगच्या प्रश्नाकडे थोडं दुर्लक्ष करत तिच्यासोबत कॉफी प्यायला आपल्याला नक्कीच आवडेल, असं तो म्हणाला होता. ज्यानंतर आता रणवीरने थेट त्यांची भेटच घडवून आणली आहे. त्यामुळे आता ही थेट भेट चांगलीच चर्चेत आली आहे.
'केदारनाथ' या चित्रपटातून झळकल्यानंतर साराने हिंदी चित्रपट विश्वात पदार्पण केलं. एक अभिनेत्री म्हणून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. येत्या काळात ती रणवीर सिंग याच्यासोबत 'सिंबा' या चित्रपटातून स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.