व्हिडिओ पोस्ट करत रितेशने आणली विमानतळ व्यवस्थापकांना जाग

लगेचच त्याच्या या व्हिडिओची दखल घेतली गेली. 

Updated: May 28, 2019, 03:54 PM IST
व्हिडिओ पोस्ट करत रितेशने आणली विमानतळ व्यवस्थापकांना जाग  title=

हैदराबाद : आग लागण्याच्या घटनांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच आहे. विविध कारणांमुय़ळे लागलेल्या याच आगीत अनेक निष्पापांचे बळीही जात आहेत. मुख्य म्हणजे या अशा घटनांबाबत आता जनसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. याच धर्तीवर एक दुर्घटना टाळण्यासाठी म्हणून अभिनेता रितेश देशमुख याने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हैदराबाद विमानतळावरील हा व्हिडिओ पोस्ट झाल्याचं लक्षात येताच लगेचच विमानतळावरील व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली. 

रितेशने एकामागोमाग एक असे काही व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले. या व्हिडिओमध्ये विमानतळावरील प्रवासी अत्यंत चिंतातूर आणि अडचणीत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमधील पहिला व्हिडिओ हा विमानतळाच्या लाऊंजवरील आहे. जेथे बाहेर जाण्याचा रस्ता पूर्णपणे बंद आहे. त्याला पर्याय म्हणून फक्त एका लिफ्टचाच (उदवाहनाचा) वापर शक्य आहे. मुख्य म्हणजे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ही लिफ्टही आधीपासूनच बंद आहे. ही एकंदर परिस्थिती पाहता रितेशने अचानक इथे आग लागली तर, एका मोठ्या दुर्घटनेच्या प्रतिक्षेत आहेत.... असं उपरोधिक विधान केलं. 

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्येही दिसत आहे की, सुरक्षा रक्षक आपातकालीन दरवाज उघडण्यास नकार देत आहेत. प्रवाशांनी वारंवार विनवणी करुनही ते नकार देत आहेत. रितेशचं हे ट्विट पाहून हैदराबाद विमानतळ व्यवस्थापनाकडून याची दखल घेण्यात आली. ज्यामध्ये त्यांनी बाहेर पडण्याच्या मार्गाविषयीची माहिती दिली. एकंदरच प्रवासादरम्यान रितेशची सतर्कता आणि त्यानंतर परिस्थिती सावरून नेण्यासाठीचे प्रयत्न पाहायला मिळाले.