मुंबई : अभिनेता किंवा अभिनेत्री हे त्यांच्या वाट्याला येणाऱ्या प्रसिद्धीसोबतच दर दिवसाआड ते चाहत्यांशी आणि समाजाशी जोडले जातात. या कलाकार मंडळींच्या खांद्यांवर एक प्रकारची जबाबदारीच असते. याच जबाबदारीतून मग लक्ष लागून राहतं ते म्हणजे सेलिब्रिटी मंडळींच्या विविध विषयांवरील मतांकडे.
सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याने आपलं मत मांडत वर्णभेद आणि व्यक्तीच्या एकंदर शरीरयष्टीविषयी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. तो सेलिब्रिटी म्हणजे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान.
कोलकाता फिल्म फेस्टिवलमध्ये पोहोचलेल्या शाहरुखला ज्यावेळी रंग उजळण्याच्या क्रीमच्या जाहिरातीविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा या प्रश्नाचं उत्तर देत त्याने सुहानाचा उल्लेख केला.
चाहते आणि फॉलोअर्ससोबत आपण कधीही खोटं आणि चुकीचं न वागल्याचं त्याने या कार्यक्रमात सांगितलं. 'कोणत्याही व्यक्तीविषयी मी त्याच्या किंवा तिच्या दिसण्यावरुन निष्कर्ष काढले नाहीत', असं तो म्हणाला.
'मी स्वत:लासुद्धा कधीच सुंदर मानलं नाही. मी उंच आहे, माझी देहयष्ठी तितकी प्रभावी नाही, मला नृत्यही नीट जमत नाही, माझे तर केसही चांगले नाहीत. किंबहुना मी कोणत्याच अभिनय प्रशिक्षम संस्थेतून आलेलोही नाही. मी एक अतिशय सर्वसमान्य व्यक्ती आहे', असं त्याने स्पष्ट केलं.
आपली पत्नी, मुलगी, मुलं हेसुद्धा इतरांपर्यंतच अगदी सर्वसामान्य असल्याची बाब त्याने यावेळी अधोरेखित केली. इतरांना आपण त्यांच्या दिसण्यावरुन, त्या तुलनेने वागणूक दिली तर हे अतिशय चुकीचं ठरेल हा मुद्दाही त्याने स्पष्ट केला.
आपलं म्हणणं पटवून देताना शाहरुखने त्याच्या मुलीचा म्हणजेच सुहानाचाही उल्लेख केला. 'मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो. हो.... माझी मुलगी सुहाना सावळी आहे. पण, तरीही ती जगातील सर्वात सुंदर मुलगी आहे', असं तो म्हणाला.
वर्ण आणि रंग उजळणाऱ्या क्रीमच्या जाहिराती, याविषयी किंग खानचं हे मत पाहता त्याने अतिशय महत्त्वाचे मुद्दे सर्वांसमोर मांडले आहेत, असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान, शाहरुखच्या मुलीविषयी सांगावं तर, सध्या ती शिक्षणाकडेच लक्ष केंद्रीत करत आहे.
पण, काही दिवसांपूर्वीच एका मासिकासाठी तिने केलेलं फोटोशूट पाहता येत्या काळात सुहाना रुपेरी पडद्यावर झळकली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही हेसुद्धा तितकच खरं.