'कबीर सिंग'ला मिळालेल्या अनपेक्षित प्रेमानं शाहिद भारावला

पाहा असं नेमकं झालं तरी काय   

Updated: Oct 11, 2019, 01:40 PM IST
'कबीर सिंग'ला मिळालेल्या अनपेक्षित प्रेमानं शाहिद भारावला
'कबीर सिंग'ला मिळालेल्या अनपेक्षित प्रेमानं शाहीद भारावला

मुंबई : काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'कबीर सिंग' या चित्रपटातून शाहिद कपूरच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली. एक अभिनेता म्हणून परिपूर्ण असल्याची प्रतिक्रियाच शाहिदचा हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी दिली. या चित्रपटासाठी शाहिदने प्रचंड मेहनत घेतली होती. ज्याचे परिणाम चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांमध्ये पाहायला मिळाले. 

संदीप रेड्डी वंगाच्या दिग्दर्शनात साकारलेल्या 'कबीर सिंग' या चित्रपटातील अनेक दृश्यांमध्ये शाहिदचा अफलातून अभिनय पाहायला मिळाला. प्रेक्षकांनी तर त्याच्या प्रत्येक दृश्याला दाद दिली. किंबहुना एका चाहत्याकडून चित्रपटातील एका दृश्याचं इतक्या बारकाईने निरीक्षण करण्यात आलं आहे की जे पाहून शाहिदही भारावला आहे. 

कियारा अडवाणी हिने साकारलेल्या 'प्रिती'ला बऱ्याच महिन्यांनी जेव्हा शाहिद साकारत असणारा 'कबीर' भेटतो, त्याचवेळी तो वडील होणार असल्याचंही त्याला कळतं. ज्यानंतर कबीर प्रितीला मिठी मारतो. याच दृश्याच्या वेळी शाहिदच्या अंगावर शहारा आला होता. चित्रपट पाहताना ही बाब लक्षात येताच सोशल मीडियावर यासंदर्भातील एक फोटोही पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये एखादं पात्र साकारतेवेळी त्याचा सर्वस्वाने स्वीकार करण्याची बाब अधोरेखित करत शाहिदप्रती आदराची भावना व्यक्त करण्यात आली आहे. 

चाहत्यांकडून करण्यात आलेल्या या निरीक्षणाने भारावलेल्या शाहिदनेही चाहत्यांचे आभार मानत त्यांचं ट्विट शेअर केलं. कलाकार आणि चाहत्यांमध्ये असणारं हे नातं खऱ्या अर्थाने बरंच काही सांगून जात आहे.