close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...तर तुमच्यासाठीही फलदायी ठरेल बी- टाऊनचा 'द झोया फॅक्टर'

पाहा हा व्हिडिओ 

Updated: Aug 25, 2019, 02:03 PM IST
...तर तुमच्यासाठीही फलदायी ठरेल बी- टाऊनचा 'द झोया फॅक्टर'

मुंबई : हिंदी कलाविश्वात अभिनय आणि फॅशनच्या बळावर लोकप्रिय ठरणाऱ्य़ा अभिनेत्री सोनम कपूर एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या याच नव्या आणि तितक्याच कुतूहलपूर्ण रुपाची झलकही प्रेक्षकांना पाहता येत आहे. निमित्त ठरत आहे ते म्हणजे तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर. 

अनुजा चौहान यांच्या एका काल्पनिक कथेवर साकारल्या गेलेल्या 'द झोया फॅक्टर' या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचं कथानक एका राजपूत मुलीभोवती फिरत असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुळात हिंदू पण, मुस्लिम धर्मातील नाव असणारी ही मुलगी आणि तिची कहाणी खऱ्या अर्थाने अतिशय मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. 

सोनमनेच सोशल मीडिया अकाऊंटवरुन या चित्रपटाचा टीझर शेअर केला. या टीझरमध्ये टीव्हीवर येणाऱ्या अनेक जाहीरातींचा संदर्भ घेत 'झोया फॅक्टर' तुमच्यासाठी किती फायद्याचं ठरणार आहे, हे सांगितलं जात आहे. ज्या जाहीरातीत सोनमच्या भूमिकेचीही झलक दिसत असून, ती एका देवीच्या रुपात दिसत आहे. 

समज गैरसमज, समजुती, अंधश्रद्धा आणि नशीबाचा खेळ या साऱ्याची झलक अवघ्या काही सेकंदाच्या या टीझरमधून पाहायला मिळत आहे. त्यामुळे अर्थातच चित्रपटाच्या ट्रेलरचीही उत्सुकता वाढली आहे. सोनमसोबत या चित्रपटातून मल्याळम अभिनेता दुलकर सलमान स्क्रीन शेअर करणार आहे. बॉलिवूडमध्ये हा त्याचा दुसरा चित्रपट आहे.