२२ वर्षांनंतर सनी देओलसह बॉलिवूड अभिनेत्रीवर आरोप निश्चित

त्यांना या अडचणीच्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.   

Updated: Sep 21, 2019, 03:11 PM IST
२२ वर्षांनंतर सनी देओलसह बॉलिवूड अभिनेत्रीवर आरोप निश्चित

मुंबई : अभिनय विश्वाकडून राजकीय वर्तुळाकडे वळलेल्या अभिनेता सनी देओल यांच्या अडचणी येत्या काळात वाढण्याची चिन्हं आहेत. २२ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात सनी देओल यांच्यासोबतच एका बॉलिवूड अभिनेत्रीवरील आरोपांची निश्चिती करण्यात आली आहे. ज्यामुळे त्यांना या अडचणीच्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. 

१९९७ मध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, रेल्वेची साखळी खेचल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. १९९७ मध्ये 'बजरंग' या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अपलिंग एक्स्प्रेसची साखळी खेचल्यामुळे ही ट्रेन २५ मिनिटे उशिराने धावत होती. ज्यामुळे सनी आणि करिष्मा यांच्यावर आरोप करण्यात आले होते. सदर प्रकरणी सनी देओल जयपूरला पोहोचल्याचं कळत आहे. 

आणखी दोघांवरील आरोपही निश्चित 

सनी देओल आणि करिष्मा कपूर यांच्याव्यतिरिक्त स्टंटमॅन टीनू वर्मा आणि सतीश शाह यांच्यावरही चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अजमेर प्रांतातील नरेना रेल्वे स्थानकात बेकायदेशीररित्या प्रवेश करण्याचा आरोप करण्यात आला होता. याच वेळी २४१३ - ए अपलिंक एक्स्प्रेस या ट्रेनची साखळी खेचण्यात आली होती. परिणामी ही ट्रेन २५ मिनिटं उशिराने धावत होती. मंगळवारी याच प्रकरणीची महत्तावाची सुनावणी करण्यात आली. 

दरम्यान, सनी देओल आणि करिष्मा कपूर यांनी रेल्वे न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत सत्र न्यायालयाच एक याचिका दाखल केली होती. त्यांच्याविरोधात रेल्वे कायद्याअंतर्गत येणाऱ्या कलम १४१, कलम १४५, कलम १४६ आणि १४७ अंतर्गत आरोप करण्यात आले होते. या प्रकरणाला आता पुढे काय वळण मिळणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.