राजेश खन्ना यांनी का बदललेली त्यांच्या वरातीची वाट?

'मेरे सपनो की रानी कब आयेगी तू....', असं म्हटलं की एक चेहरा लगेचच डोळ्यांसमोर येतो.

Updated: Dec 29, 2018, 11:08 AM IST
राजेश खन्ना यांनी का बदललेली त्यांच्या वरातीची वाट? title=

मुंबई : 'मेरे सपनो की रानी कब आयेगी तू....', असं म्हटलं की एक चेहरा लगेचच डोळ्यांसमोर येतो. तो सुरेख चेहरा म्हणजे अभुनेते राजेश खन्ना यांचा. आपल्या अनोख्या आणि प्रभावी अभिनय शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजेश खन्ना यांची आज जयंती. हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना आज आपल्यात नसले तरीही त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून हा महान अभिनेता नेहमीच आपल्यात राहील असं म्हणायला हरकत नाही. 

पंजाबमध्ये जन्मलेल्या जतिन खन्ना म्हणजेच राजेश खन्ना यांची चित्रपट विश्वाकडे आधीपासूनच ओढ होती. ‘आखरी खत’या चित्रपटातून सुरु झालेला त्यांचा अभिनयाचा प्रवास शक्ती सामंता यांच्या ‘आराधना’ या चित्रपटापर्यंत आला आणि जन्म झाला राजेश खन्ना नावाच्या सुपरस्टारचा. 

सलग १५ चित्रपटांमध्ये काम करत ते बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आणि खन्ना यांच्या नावावर एक वेगळा विक्रम प्रस्थापित झाला. चॉकलेट बॉय, तरुणींच्या मनावर राज्य करणारा अभिनेता आणि त्याच्यावर असणारं चाहत्यांचं अमाप प्रेम काय असतं हे खऱ्या अर्थाने कोणी अनुभवलं असेल तर ते म्हणजे राजेश खन्ना यांनी. त्यांचं पडद्यावरचं आयुष्य जितकं रंजक होतं, तितकच त्यांच्या खासगी आयुष्यातही बरीच वादळं पाहायला  मिळाली. 

सुरुवातीलापासूनच अंजू महेंद्रू आणि राजेश खन्ना यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होती. त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चाही सर्वदूर पसरल्या होत्या. पण, कालांतराने डिंपल कपाडियासोबत राजेश खन्ना यांचं नाव जोडलं गेलं आणि अंजूसोबतच्या त्यांच्या नात्यात दुरावा आला.

बराच काळ चाललेल्या या नात्यात दुरावा आल्यानंतर राजेश खन्ना यांच्या आयुष्यात तिची जागा भरुन काढण्यासाठी दुसऱ्याच मुलीचा प्रवेश झाला होता. ती मुलगी होती डिंपल कपाडिया. पाहताच क्षणी डिंपलच्या सौंदर्यावर भाळलेल्या या खन्ना यांनी तिच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांचं हे नातंसुद्धा बरंच चर्चेचा विषय ठरलं.

डिंपल कपाडियासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर राजेश खन्ना यांनी चक्क त्यांच्या वरातीची वाट बदलली होती. मुख्य म्हणजे त्यांनी ठरलेल्या रस्त्यावरुन न जाता अंजू महेंद्रू यांच्या घराजवळून जाणारा रस्ता वरातीसाठी निवडला. हे करण्यामागे त्यांचा नेमका हेतू काय होता याविषयी तेच जाणत असावेत. पण, त्यांच्याविषयीच्या आठवणी सांगताना वरातीचा किस्सा सुद्धा आवर्जून सांगितला जातो आणि पुन्हा हाच प्रश्न उपस्थित केला जातो की, राजेश खन्ना यांनी का बदललेली त्यांच्या वरातीची वाट?