चाहतीसाठी अभिनेत्याने छेडले सूर; आवाज ऐकून सारेच थक्क

ही कलाही त्याला चांगलीच अवगत आहे, असं म्हणावं लागेल 

Updated: Sep 26, 2019, 12:58 PM IST
चाहतीसाठी अभिनेत्याने छेडले सूर; आवाज ऐकून सारेच थक्क title=
चाहतीसाठी अभिनेत्याने छेडले सूर; आवाज ऐकून सारेच थक्क

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना बऱ्याच कला अवगत आहेत. मग तो अभिनय असो, गायनकला असो किंवा मग नृत्यकला किंवा एखाद्या वाद्याविषयी असणारं ज्ञानं. छंद आणि मत त्यावर मिळवलं जाणारं प्रभुत्व या बळावर प्रत्येक सेलिब्रिटीमध्ये असे अनेक सुप्त गुण असतात. अभिनेता टायगर श्रॉफ यालाही अशीच एक कला अवगत आहे, ज्याची प्रचिती नुकतीच एका कार्यक्रमादरम्यान आली.

एक अभिनेता असण्यासोबतच टायगर तितकंच चांगलं नृत्य करतो. शिवाय मार्शल आर्ट्सवर त्याची पकड आहे, हे आपण सारे जाणतोच. अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या या मुलाच्या आणखी एका कलागुणाची झलक नुकतीच 'द कपिल शर्मा शो'मध्ये पाहायला मिळाली. 

'वॉर' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी टायगर पोहोचला होता. यावेळी त्याने एका चाहतीसाठी चक्क गाणं गायलं. टायगरने गायलेलं गाणं पाहून आणि ऐकून कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आणि विनोदवीर अभिनेता कपिल शर्मा यालाही धक्काच बसला. 

खुद्द टायगरनेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये चाहतीसाठी तो मनापासून सूर छेडसाना दिसत आहे. 'माझ्यात दडलेला बाथरुम सिंगर बाहेर आला तेव्हा...', असं म्हणत त्याने हा व्हिडिओ पोस्ट केला. त्याच्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक केलं, तर कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांनी त्याची प्रशंसाही केली. टायगरचा हा अंदाज पाहता, येत्या काळात तो गायक म्हणून समोर आला, तर आश्चर्याने भुवया उंचावण्याचं कारण नाही.