मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर भाष्य करणाऱ्या 'PM Narendra Modi' या बायोपिकच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, त्याची स्टारकास्टही जाहीर करण्यात आली आहे. झरिना वाहाब, मनोज जोशी, प्रशांत नारायणन आणि बरखा बिश्त सेनगुप्ता या कलाकारांची मोदींच्या बायोपिकमध्ये वर्णी लागली आहे.
काही दिवसांपूर्वीच फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आलेल्या या चित्रपटात बोमन इराणी, दर्शन कुमार, अक्षत सलूजा, अंजन श्रीवास्तव, राजेंद्र गुप्ता आणि यतिन कार्येकर यांच्याही भूमिका पाहता येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्यक्तीरेखा साकारण्याची जबाबदारी अभिनेता विवेक ओबेरॉयच्या खांद्यावर असून, त्याच्या भूमिकेवर सर्वांचच विशेष लक्ष असणार आहे.
बायोपिकच्या ट्रेंडने बॉलिवूडमध्ये धरलेला तग आणि प्रेक्षकांचा अशा चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता मोदींचा जीवनप्रवासही रुपेरी पडद्यावर गाजतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. याच आगामी चित्रपटाविषयी निर्माते संदीप सिंग यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
''चित्रपट दुनियेतील एका प्रभावी अनुभवाचा पाया म्हणजे तगडी स्टारकास्ट आणि त्याच दमाचे कलाकार. 'PM Narendra Modi'च्या निमित्ताने आम्हाला असे कलाकार गवसले आहेत जे फक्त अनुभवीच नाहीत तर एक दर्जेदार चित्रपट साकारण्यासाठीच्या सर्व आवश्यक गोष्टींचं सर्वोत्तम समीकरण आहेत'', असं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकत त्यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा या चित्रपटातून घेण्यात येणाक आहे. २०१४च्या निवडणूकांवरही या चित्रपटातून विशेष लक्ष देण्यात येणार असून, आता या असंख्य गोष्टी काही तासांच्या चित्रपटात मांडण्याचं आव्हान दिग्दर्शक आणि चित्रपटाती संपूर्ण टीम पेलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.