मुंबई : चौकटीबद्ध विषयांना शह देत काही प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'लिपस्टीक अंडर माय बुरखा' या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीही दाद दिली होती. अशा या चित्रपटातूनच झळकलेल्या अभिनेत्री आहाना कुमरा हिने चित्रीकरणादरम्यानच्या एका प्रसंगाचा उल्लेख करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. एका दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या वक्तव्यामुळे आपल्याला काहीसे संकोचल्यासारखे वाटल्याचं ती म्हणाली असून, त्यापुढेही तिने काही महत्त्वाच्या गोष्टी सर्वांसमोरच उघड केल्या.
३४ वर्षीय आहाना कुमरा हिने यापूर्वी कधीच अशा प्रकारच्या (इंटिमेट) दृश्यात काम केलं नव्हतं. त्यामुळे मुळात ती स्वत: च्या दृश्याच्या चित्रीकरणावेळी काहीशी गोंधळलेली होती. 'चित्रपटाची दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तव हिने सर्व बोल्ड/ इंटिमेट दृश्यांचं चित्रीकरण हे बंद सेटवर आणि तेसुद्धा अगदी मोजक्या जणांच्याच उपस्थितीत पार पडेल याची काळजी घेतली होती. इंटिमेट दृश्याचं चित्रीकरण सुरु असतेवेळी प्रकाश झा तेथे आले. त्यावेळी विक्रांत मेसीसोबत माझ्या त्या दृश्याचं चित्रीकरण सुरू होतं. मी यापूर्वी कधीची इंटिमेट दृश्य साकारलं नव्हतं. त्यामुळे त्यावेळी मलाही त्या प्रकारचा अभिनय करण्यात काही अडचणी येत होत्या', असं आहाना 'आयएएनएस' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
प्रकाश झा हे स्वत:सुद्धा एक दिग्दर्शक असल्यामुळे त्यांनी चित्रीकरण सुरू असतेवेळी 'त्या' दृश्याविषयी काही सल्ले दिले. पण, या सर्व गोष्टी आपल्याला दिग्दर्शिकेकडून (अलंकृताकडून) सांगितलं जाणं अपेक्षित असल्याचं आहानाने स्पष्ट केलं. 'काही वेळासाठी सेटवर थांबल्यानंतर ते गेले आणि त्यानंतरही आम्ही चित्रीकरण सुरुच ठेवलं होतं. पुढे त्यांनी दिलेल्या सल्ल्यांचा आम्ही चित्रीकरणातही अवलंब केला', असा उलगडाही तिने केला.
चित्रीकरणादरम्यानच्या त्या प्रसंगाविषयी केलेल्या वक्तव्याला उगाचच हवा दिली गेल्याचं मतही तिने मांडलं. प्रकाश झा यांना नेहमी भेटल्यावर त्यांनी कायम सर्व कलाकारांना आदराची वागणूक दिली आहे. विनाकारण त्यांचं नाव अशा प्रकारे गोवलं जाणं हे अतिशय चुकीचं आहे, कारण त्यांनी माझ्यावर कोणतंही विधान केलं नव्हतं, ते पूर्णपणे त्या दृश्याशी संबंधित होतं', हा महत्त्वाचा खुलासा तिने केला. ते नेमके काय म्हणाले होते, असं विचारलं असता मात्र आपल्याला ते सांगण्यात संकोचलेपणा वाटत असल्याचं सांगत आहानाने या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.