मुलाच्या जन्मानंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रियकराशी बांधणार लग्नगाठ

विविध कार्यक्रमांना तिची उपस्थिती होतीच. पण... 

Updated: Sep 25, 2019, 05:31 PM IST
मुलाच्या जन्मानंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रियकराशी बांधणार लग्नगाठ
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या एका अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी कलाविश्वापासून दूर राहण्याला प्राधान्य दिलं. विविध कार्यक्रमांना तिची उपस्थिती होतीच. पण, रुपेरी पडद्यापासून मात्र तिने दुरावा स्वीकारला होता. या वेळी तिने खासगी आयुष्याला प्राधान्य दिलं होतं. ती अभिनेत्री म्हणजे एमी जॅक्सन. 

'एक दिवाना था' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या एमीने नुकतच एका मुलाला जन्म दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही गोड बातमी चाहत्यांना दिली. आपल्या बाळाचं नाव जाहीर करणाऱ्या एमीवर यानंतर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. फक्त तिलाच नव्हे, तर तिच्या जोडीदाराला म्हणजेच George Panayiotou यालाही अनेकांनीच शुभेच्छा दिल्या. 

मुलाच्या येण्याने आनंददायी क्षणांचा आस्वाद घेणाऱ्या एमीविषयीची आणखी एक आनंदाचीच बातमी समोर आली आहे. George Panayiotou या आपल्या जोडीदारासोबतचं हे नातं पुढे नेत आता एमी त्याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

 
 
 
 

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

'पिंकव्हिला'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार एमी जॅक्सन आणि जॉर्ज पानाईयोटौ George Panayiotou पुढील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. माध्यमांमध्ये चर्चेत असणाऱ्या वृत्तानुसार 'बीचसाईड वेडिंग' या थीमनुसार समुद्रकिनारी सुरेख अशा वातावरणात ते एकमेकांना आयुष्यभरासाठी साथ देण्याचं वचन देतील. लग्नासाठी त्यांनी ग्रीसची निवड केल्याचीही माहिती समोर आली आहे. तेव्हा आता एमीसाठी ही आणखी एक आनंदाची बातमी आहे, असंच म्हणावं लागेल. 

एमी आणि तिच्या जोडीदाराने या वर्षाच्या सुरुवातीलाच साखरपुडा झाल्याचं जाहीर केलं होतं. ज्यानंतर या जोडीचे अनेक फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधत होते. जॉर्जसोबतच्या या नात्याची सुरेख बाजू एमीने कायम सर्वांसमोर ठेवली. ज्यानंतर आता या दोघांच्याची विश्वात एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. मुख्य म्हणजे पुढील वर्षी त्यांचा विवाहसोहळाही खासच असेल यात शंका नाही.