मुंबई : मोस्ट हॅपनिंग सेलिब्रिटी कपल म्हणून अनेकांच्याच नजरा वळवणाऱ्या अभिनेत्री anushka sharma अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार, जागतिक ख्यातीचा क्रिकेटपटू virat kohli विराट कोहली यांच्या नात्यात आता एक अत्यंत महत्त्वाचं वळण आलं आहे. हे वळण त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं मोठी जबाबदारी घेऊन आल्याचं दिसत आहे. यामागचं कारणंही तसंच आहे.
अनुष्का आणि विराट या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोटो पोस़्ट करत गोड बातमी दिली आहे. ही बातमी आहे या दोघांच्या नात्यात येणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीची. म्हणजेच एका नव्या पाहुण्याची. विरुष्कानं शेअर केलेली पोस्ट पाहता बी- टाऊनच्या या अभिनेत्रीला मातृत्त्वाची चाहूल लागल्याचं स्पष्ट होत आहे.
'...आणि मग आम्ही दोनाचे तीन झालो', असं कॅप्शन लिहित विराट आणि अनुष्कानं एक गोड असा फोटो चाहत्यांच्या भेटीला आणला. या फोटोमध्ये अनुष्काचं बेबी बंप दिसत आहे. शिवाय आई- बाबा होण्याची जबाबदारी स्वीकारणारं हे सेलिब्रिटी कपलही फार आनंदात दिसत आहे.
सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी सर्वांना सांगताच विराट आणि अनुष्कावर अनेकांनीच शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. सेलिब्रिटी वर्तुळापासून ते अगदी क्रीडा जगतापर्यंत अनेकांनीच या नव्या पाहुण्याच्या आगमनाची बातमी ऐकल्यानंतर विरुष्काला शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर ही गुड न्यूज क्षणार्धातच ट्रेंडमध्येही आली.