#Chhapaak : ऍसिड हल्ला पीडितेच्या रुपात दीपिकाची पहिली झलक

चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहता याचा सहज अंदाज लावता येत आहे की.... 

Updated: Mar 25, 2019, 10:01 AM IST
#Chhapaak : ऍसिड हल्ला पीडितेच्या रुपात दीपिकाची पहिली झलक  title=

मुंबई : विविध काल्पनिक आणि वास्तविक घटनांचा आधार घेत आजवर हिंदी कलाविश्वात अनेक चित्रपट साकारण्यात आले आहेत. या चित्रपटांमध्ये कलाकारांसोबतच दिग्दर्शक आणि ती कलाकृती घडवून आणणाऱ्यांपैकी प्रत्येकाचेच कलागुण पणाला लागतात. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने नुकताच शेअर केलेला तिच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहता याचा सहज अंदाज लावता येत आहे. 

दीपिकाने सोशल मीडियावर तिच्या ‘छपाक’ या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक सर्वांच्या भेटीला आणला आहे. ऍसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यातील काही प्रसंगांवर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. दीपिका यात मुख्य भूमिकेत झळकत आहे. तिने या चित्रपटाचा प्रस्ताव स्वीकारला त्या दिवसापासूनच एका अद्वितीय कलाकृतीचा नमुना पाहायला मिळणार अशा चर्चांना उधाण आलं. किंबहुना प्रेक्षकांचा याविषयीची हमीच होती. हा फर्स्ट लूक पाहता हीच बाब अनेक अंशी सिद्ध होत आहे. 

लक्ष्मी अग्रवालच्या चेहरेपट्टीतील अनेक बारकावे मेकअपच्या माध्यमातून दीपिकाच्या चेहऱ्यावर साकारण्यात आले आहेत. पण, मेकअपच्या या किमयेसोबतच लक्ष्मीच्या डोळ्यांत असणारे भाव टीपण्यातही दीपिका यशस्वी ठरली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. छपाकच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्याचं म्हणत दीपिकाने जो फोटो शेअर केला आहे, त्यात ती आरशाच्या आडून पाहताना दिसत आहे. आशावादी नजरेने आणि चेहऱ्यावर सकारात्मकता, स्मितहास्य असणारे तिचे भाव बरंच काही सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्यतीत होत आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच १० जानेवारी २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

‘छपाक’मध्ये दीपिका साकारत असणाऱ्या पात्राचं नाव ‘मालती’ असल्याचं कळत आहे. अभिनेता विक्रांत मेसी हासुद्धा या चित्रपटातून दीपिकासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे या दोघांनाही एका आव्हानात्क आणि तितक्याच अद्वितीय कथानकाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पाहणं ही प्रेक्षकांसाठी एक परवणीच असणार आहे.