मुंबई : फिटनेससाठी ओळखली जाणारी आणि कलाविश्वात आपलं अनोखं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून तिच्या कुटुंबात एका नव्या पाहुणीच्या स्वागताच्या प्रतिक्षेत आहे. आपल्या आठ वर्षांच्या मुलाला एक बहीण असावी या उद्देशाने तिने एका मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. पण, य़ामध्ये तिला आता किमान दोन वर्षांहूनही अधिक काळ प्रतिक्षा करावी लागत आहे.
बी- टाऊनची फिटनेस दिवा म्हणून ओळखली जाणारी ही अभिनेत्री आहे, मंदिरा बेदी. प्रभास स्टारर 'साहो' या चित्रपटातून झळकलेल्या मंदिरा बेदी हिने तिच्या जीवनातील एका अत्यंत महत्त्त्वाच्या निर्णयाविषयी 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत माहिती दिली आहे. 'राज आणि मी आमचा मुलगा वीर (जो आठ वर्षांचा आहे) त्याच्यासाठी एक बहीण असावी अशी इच्छा मनी बाळगतो. त्यासाठी अडीच वर्षे ते चार वर्षे या वयोगटातील एक मुलगी दत्तक घेण्याचा विचारही केला. तिच्यासाठी आम्ही एका नावाचाही विचार केला आहे. तारा असं तिचं नाव असेल', असं मंदिरा म्हणाली.
मुलगी दत्तक घेण्याच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी आपण CARA म्हणजेच (Central Adoption Resource Authority) मध्ये रितसर नावनोंदणी करत मुल दत्तक घेण्यासाठीची विचारणा केल्याचंही तिने सांगितलं. पण, दुर्दैवाने ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय वेळखाऊ आहे. तरीही आम्ही यावर परवानगी मिळताच आम्ही एका नव्या पाहुणीच्या स्वागतासाठी सज्ज आहोत', असंही मंदिरा म्हणाली.