...'या' ठिकाणी विवाहबंधनात अडकण्यास जान्हवी कपूर उत्सुक

लग्न समीप.... 

Updated: Sep 11, 2019, 12:49 PM IST
...'या' ठिकाणी विवाहबंधनात अडकण्यास जान्हवी कपूर उत्सुक
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : 'धडक' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री जान्हवी कपूर हिने फार कमी वेळात तिचा चाहता वर्ग तयार केला आहे. जान्हवीचा एकंदर अंदाज आणि कलाविश्वात तिचा वावर पाहता, यशाच्या शिखरावर तिने अचूक वाट निवडली आहे, असंच म्हणावं लागेल. येत्या काळात ती 'रुही आफ्जा' आणि 'दोस्ताना २' या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट, जाहिराती, मासिकांसाठीचं फोटोशूट अशा विविध कामांमध्ये जान्हवी प्रचंड व्यग्र आहे. ज्यामुळे तिला खासगी आयुष्यात फारसा वेळ देता येत नाही. पण, आपल्या लग्नाच्या बाबतीत मात्र तिची काही स्वप्न आहेत. 

लग्न.... जीवनाच्या प्रवासातील एक असा सोहळा जो अनेक आठवणी आपल्याला देऊन जातो. या खास दिवसाप्रती प्रत्येकाच्या काही इच्छा असतात, अर्थात जान्हवीच्याही अशाच काही इच्छा आहेत. 'ब्राईड्स टुडे' या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने याविषयीची माहिती दिली. 

आपला विवाहसोहळा कसा असावा याचं चित्र तिने तयार करुन ठेवलं आहे. डेस्टीनेशन वेडिंगचा थाट आणि परदेशातील रंगत, थीम वेडिंग या साऱ्याकडे तिचा फारसा कल नाही. याविषयी सांगताना जान्हवी म्हणाली, 'मला आतापासूनच ठाऊक आहे माझा विवाहसोहळा पारंपरिक पद्धतीने, तोही तिरुपती मंदिरात पार पडेल. त्या दिवशी मी कांजीवरम, जरीचीच साडी नेसणार आहे. लग्नसमारंभानंतर माझ्या आवडीच्या म्हणजेच दाक्षिणात्य खाद्यपदार्थांची, इडली- सांभर, दहीभात, खीर अशा पदार्थांची मेजवानी असणार आहे.'

लग्नसोहळा कसा असेल, हे जान्हवीने सांगितलं. आता तिने या मुलाखतीदरम्यान जोडीदार कसा हवा, याविषयीही सांगितलं आहे. कलागुणसंपन्न, हरहुन्नरी असा व्यक्ती आपल्याला जोडीदार म्हणून हवा असं सांगत त्याने आपल्याला नव्या गोष्टी शिकण्यासाठीही प्रेरणा दिली पाहिजे अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. सर्वात अखेरीस, त्याचं आपल्यावर असिमीत प्रेम करणारा जोडीदार हवा, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली. जान्हवीने व्यक्त केलेल्या या अपेक्षा पाहता, आता येत्या काळात तिच्या स्वप्नांचा राजकुमार तिला मिळतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.