'निर्भयाच्या मारेकऱ्यांना माफ करा म्हणणाऱ्या त्या महिलेला.....'

कंगनाचा संताप अनावर

Updated: Jan 23, 2020, 11:11 AM IST
'निर्भयाच्या मारेकऱ्यांना माफ करा म्हणणाऱ्या त्या महिलेला.....'

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत ही कायमच तिच्या थेट आणि ठाम वक्तव्यांसाठी चर्चेत राहिली आहे. कंगनाने नेहमीच काही मुद्द्यावर खुलेपणाने मतप्रदर्शन केलं आहे. सध्याही तिने निर्भया बलात्कार प्रकरणी दोषींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा आणि त्या पार्श्वभूमीवर देशातील एकंदर वातावरणावर भाष्य केलं. यावेळी इंदिरा जयसिंग यांच्या वक्तव्याप्रती तिने संताप व्यक्त केला. 

निर्भयाच्या आईने आरोपींना क्षमा करावी असं म्हणणाऱ्या इंदिरा जयसिंग यांच्यावर कंगनाने तोफ डागली. 'पंगा' या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धी निमित्ताने कंगना माध्यमांशी संवाद साधत होती. तिचं हे रौद्र रुप पाहायला मिळालं. 

इंदिरा जयसिंग यांच्या वक्तव्यावर टीका करत कंगना म्हणाली, 'त्या महिलेला (जयसिंग यांनी) चारही आरोपींसह कारागृहात ठेवायला हवं. यांच्यासारख्यात महिलांच्या पोटी असे नराधम जन्म घेतात.'

कंगनाचं हे वक्तव्य पाहता व्यापीठावर उपस्थित असणाऱ्या अश्विनी अय्यर तिवारी आणि रिचा चड्ढा यांच्या चेहऱ्यावरील एकंदर भाव पाहता त्या दोघीही तिच्याशी सहमत असल्याचं स्पष्ट झालं. निर्भया बलात्कार प्रकरणी दोषी असणाऱ्यांना भर चौकात फाशी द्यावी जेणेकरुन येत्या काळात दुष्कृत्य करणाऱ्यांना धडा मिळेल, असंही वक्तव्य तिने केलं. 

वाचा : मन्या सुर्वेला ओळखता? तो माझा भाऊ; नानांचा खुलासा 

येत्या काळात 'क्वीन' कंगना 'पंगा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वैवाहिक जीवनात काही वर्षे रुळलेल्या आणि राष्ट्रीय महिला कबड्डी संघात पुनरागमन करणाऱ्या एका महिलेची कहाणी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहता येणार आहे. रिचा चड्ढा आणि नीना गुप्तासुद्धा या चित्रपटातून झळकणार आहेत. २४ जानेवारीला 'पंगा' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.